श्री खंडोबा मंदिर परिसरातील वनाला पुन्हा आग; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप

बीड (प्रतिनिधी):(दि.२०)श्री खंडोबा मंदिरच्या पवित्र व ऐतिहासिक वनपरिसरात पुन्हा एकदा अज्ञात समाजकंटक व दारू पिणाऱ्या व्यक्तींनी जाणीवपूर्वक आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे व झाडे जळून खाक झाली असून पर्यावरणासह मंदिर परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्या असून स्थानिक नागरिक, भाविक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दररोज दर्शनासाठी येणारे भाविक, फिरायला येणारे पर्यटक तसेच योगा व मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित असतात. अशा ठिकाणी वारंवार लागणाऱ्या आगीमुळे जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी व इतिहासप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया देताना सांगितले की, मंदिर परिसरातील आग ही अपघाती नसून जाणीवपूर्वक घडवली जात आहे. अनेकदा पोलीस चौकी व नियमित गस्त सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाने तातडीने प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस चौकी स्थापन करणे, रात्रीची गस्त वाढवणे, दारू पिणाऱ्यांवर कारवाई करणे व मंदिर परिसरातील वनसंवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
—
कोट
“आम्ही मंदिर परिसराच्या सुरक्षिततेबाबत वारंवार जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदने दिलेली आहेत. दारुड्यांच्या पार्ट्या होत असून दारूच्या बाटल्यांचा खच साचल्याचे फोटो पुराव्यासह सादर केले आहेत. तरीही कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. संबंधितांना समजावून सांगितल्यास अरेरावी व हुलजत केली जाते. संरक्षण भिंतीचे (कंपाउंड वॉल) कामही अर्धवट अवस्थेत आहे. प्रशासनाकडून तातडीचे संरक्षण, पोलीस चौकी व नियमित गस्त मिळाल्याशिवाय हा पवित्र परिसर सुरक्षित राहू शकत नाही. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील.”
— रामनाथ खोड, कोषाध्यक्ष, श्री खंडोबा दिपमाळ मंदिर



