बीड

आजीचे स्वप्न पणतुच्या काळात पुर्णत्वाकडे

आजीचे स्वप्न पणतुच्या काळात पुर्णत्वाकडे

खंडेश्वरीच्या यात्रेत येणारी झुक झुक गाडीत बसून रेल्वेचे स्वप्न पाहणार्‍या बीडकरांना आता खर्‍या खुर्‍या झुक झुक आगीन गाडीत बसण्याचे स्वद्म पुर्णत्वाकडे जाताना दिसत आहे. पूर्वी कोळशावर रेल्वे चाले त्यामुळे त्याकाळी ’झुक झुक आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी हे गाणे प्रसिद्ध होते. आता डिझेल व इलेक्ट्रीकवर इंजीन धावते. बीडकरांना थोडे दिवस डिझेल इंजीनवर चालणारी रेल्वे पाहावी लागेल, मात्र येत्या काही वर्षातच वायरच्या खालून धावणारी बीन धुरांची रेल्वे पाहायला मिळणार आहे. आजीनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न आता पणतूच्या काळात पूर्ण झालेल पाहायला मिळत आहे. तीन पिढ्यांचा संघर्षाचा इतिहास नव्या पिढीसाठी एक आदर्श असाच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. तसे पाहिले तर बीडला संघर्षाचा खुप मोठा इतिहास आहे. त्यामुळे काहीही सहजासहजी मिळालेले नाही. रेल्वेही अशाच 50 वर्षाच्या संघर्षाचे फलीत आहे, बीडच्या माजी खा.स्व.केशरकाकू क्षीरसागर ते मुंडे भगिनी पर्यंतच्या काळात अनेकांचा या यशात काही ना काही खारीचा वाटा निश्चीतच आहे हे कोणी विसरून चालणार नाही. असे विसरणे म्हणजे कृतघ्नपणाचे निच कृत्य म्हणता येईल. रेल्वेच्या मागणीस 1980 नंतरच खर्‍या अर्थाने वेग आला तो तत्कालीन खासदार केशर काकू क्षीरसागर यांच्यामुळेच. तत्कालिन रेल्वेमंत्री बी.ए.गनी खान चौधरी तसेच त्यानंतर ना. बन्सीलाल, ना. माधवराव सिंधिया आणि जार्ज फर्नांडिस.

रेल्वे मंत्र्याकडे काकूंनी सारखा पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यानंतर कर्नाटकचे सी. के. जाफर शरीफ हे रेल्वेमंत्री झाले. त्यांच्या काळात काकूंनी ऐन दिवाळीच्या तोंडावर असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आपल्या कर्नाटक माहेरपणाचा आधार घेत, येत्या दिवाळीनिमित्त भावाच्या रुपाने बहिणीन’ रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी भेट द्या अशी भावनिक साद घातली अन्यथा बहिणीवर उपोषणाची पाळी येईल असा इशारा पण दिला. तेव्हा त्यांनी सर्वेच्या कामाला मंजुरी दिली व अर्थसंकल्पात तरतूद केली. रेल्वेच्या सर्वेक्षणासाठीच अनेक दशके लढा द्यावा लगला. राष्ट्रपतीपासून, पंतप्रधान, रेल्वेमंत्री, मंत्रालय यांच्याकडे वेगवेगळी शिष्टमंडळे त्या घेऊन गेल्या, तेव्हा कुठे सर्वेक्षणाचे काम मार्गी लगाले. मराठवाड्यातील संघटनाही त्यात अग्रेसर होत्या. रेल्वेच्या प्रश्नाचा मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करताना त्यांची धावपळ विषय मांडण्याची त्यांची साधी पण मार्मीक मांडणी मी जवळून पाहिलेली आहे. त्यांच्या सोबत धावपळ करताना सोबत असणारांची होणारी दमछाक मी पाहिलेली आहे आणि स्वताःही अनुभवलेली आहे. सर्वेक्षण हे फिजीबल होत नसत मात्र त्यावर अनेक तोडगे काढत काढत आता त्यांच्या स्वप्नातील रेल्वे त्यांच्या पणतुच्या काळात बीड पर्यंत आली आहे. अजून परळी पर्यंतचा मोठा टप्पा बाकी आहे. याशिवाय छ.संभाजीनगर-सोलापुर हा टप्पाही आता मार्गी लागत आहे. सर्वेक्षणाच्या रुळावरच अडकलेली ही रेल्वे येत्या काही वर्षात देशाचा केंद्रबिंदु झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्व-पश्चिम आणि उतर-दक्षिण टोक या केंद्रबिंदूतून जोडल्या गेलेली आपणास येत्या काही वर्षात पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्चीत.
कारण रेल्वेमंत्री मधु दंडवते, लालुप्रसाद यादव, सुरेश प्रभु यांच्या काळापासून आताच्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळात  रेल्वे कामांना जी गती मिळाली ती पाहता हे स्वप्न लवकर पुर्ण होईल याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. निधीच्या आकडेवारी वर नजर टाकता हे स्पषपणे जाणवते की बीडकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. युपीएच्या काळात राज्यासाठी रेल्वेने 1171 कोटीची तरतूद केली होती. सुरेश प्रभु यांच्या 2014-16 काळात ही तरतूद 3586 कोटी करण्यात आली होती तर 2017 ला हीच तरतूद 6 हजार कोटी करण्यात आली. आता तर केंद्राने राज्यासाठी 1 लाख 37 हजार 651 कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे निधी अभावी राज्यातील रेल्वेचे काम रखडणार नाही अशी अपेक्षा आहे.

जगन्नाथाचा हा रथ सर्वांच्या सहकार्याशिवाय कसा पार पडणार, हजारो हात या कामी आलेले आहेत. कोणा दोघा चौघांचे हे काम नाही, जिल्ह्यातील अनेक नेते, अनेक डॉक्टर, व्यापारी संघटना, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, प्रसंगी रस्त्यावर उतरलेेली जनता या सर्वांचे मेहनतीचे हे फळ आहे. एवढे मात्र खरे.

गुलाब भावसार
ज्येष्ठ पत्रकार, बीड

Back to top button