थकीत पाणीपट्टीवरील व्याज-दंड पुर्णतः माफ करा; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करु

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अंजनगाव सुर्जी : शहरातील नागरिकांचे थकीत पाणीपट्टीवरील वाढते व्याज व दंड पुर्णतः माफ करून “अभय योजना” जाहीर करावी, अशी मागणी उडान महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अंजनगाव सुर्जी शहर व परिसरातील गोरगरिब, शेतकरी, मजूर, मोलमजुरी करणारे कामगार, लघुउद्योजक तसेच निम्न-मध्यमवर्गीय नागरिक सध्या वाढत्या महागाईमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रोजगाराच्या मर्यादित संधी, वाढलेला उदरनिर्वाह खर्च आणि शेतीतील अनिश्चित परिस्थिती यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत थकीत पाणीपट्टीवर आकारले जाणारे मोठे व्याज व दंड सर्वसामान्य नागरिकांसाठी जड ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अनेक नागरिक मूळ पाणीपट्टी भरण्यास इच्छुक असतानाही वाढलेल्या व्याज व दंडामुळे त्यांना थकीत रक्कम भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ “अभय योजना” जाहीर करून थकीत पाणीपट्टीवरील व्याज व दंड सरसकट माफ करावा, तसेच नागरिकांना मूळ थकबाकी भरण्यासाठी सवलतीचा कालावधी व हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच अभय योजना लागू होईपर्यंत नोटिसा व दंडात्मक कारवाई तात्पुरती स्थगित ठेवण्याची विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे. प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास नाईलाजास्तव नागरिकांच्या सहभागाने कायदेशीर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी उडान महिला चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



