स्वतःला घडवायचं असेल तर विचार, वागणं आणि प्रामाणिकपणा शुद्ध ठेवा – प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे

तुलसी शैक्षणिक समूह आयोजित ‘सन्मान संघर्षाचा’ कार्यक्रमात मनीषाताई कदम व त्यांच्या तीन कन्यांचा गौरव
बीड (दि. १८ ): थोर महापुरुषांचे विचार आणि त्यांचे चरित्र आत्मसात केल्याशिवाय यशाचा खरा मार्ग सापडत नाही. समाजात वाढणाऱ्या विकृतींपासून दूर राहून सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करणे आणि शुद्धतेच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. आई-वडिलांशी, गुरुजनांशी आणि समाजाशी प्रामाणिक राहा. विचार शुद्ध ठेवले, तर यश कोणीही अडवू शकत नाही, असे प्रतिपादन शिरूर कासार येथील कालिकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांनी केले.
तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने आयोजित ‘सन्मान संघर्षाचा’ या विशेष कार्यक्रमात परळी वैजनाथच्या मनीषा विजय कदम आणि त्यांच्या तीन कन्यांचा गौरव करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मनीषाबाईंनी धुणीभांडी करून आपल्या तीन मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांच्या अथक कष्टातून दिक्षा, सोनाली आणि समीक्षा यांनी यश मिळवत सरकारी सेवेत प्रवेश करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. हा गौरव समारंभ शुक्रवार, दि. १८ जुलै रोजी तुलसी संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे पार पडला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कंधारे यांनी वरील मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.धम्मपाल घुंबरे, डॉ.विक्रम धन्वे, डॉ.संजय सावते, प्राचार्य प्रा.डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दिक्षा, सोनाली, समीक्षा आणि त्यांच्या आई मनीषा कदम यांचा स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व प्रेरणादायी पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सोनाली आणि समीक्षा म्हणाल्या, मेहनत, संयम, अभ्यास, सातत्य आणि योग्य वेळी मिळालेलं मार्गदर्शन यामुळे आमची घडण झाली. त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास आणि डोळ्यांतून व्यक्त होणारी कृतज्ञता उपस्थितांना भारावून गेली.
अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे म्हणाले, आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु असते. ती केवळ रडायला शिकवत नाही, तर लढायला शिकवते, संघर्ष करायला शिकवते. मनीषाताईंचा संघर्ष हा प्रत्येक आईसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे.उपस्थित मान्यवरांनी या कुटुंबाच्या संघर्षकथेप्रती कृतज्ञता व्यक्त करत, हा संघर्ष आणि यश नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरेल, असे मत मांडले.प्रास्ताविक डॉ.विक्रम धन्वे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय सावते, तर आभार प्रदर्शन प्रा. शिल्पा बोराडे यांनी केले.कार्यक्रमास तुलसी शैक्षणिक समूहाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



