बीड

चौंडी-इंदौर बस सेवा उज्जैनपर्यंत वाढवावी – वंचित बहुजन आघाडीची मागणी

चौंडी-इंदौर बस सेवा उज्जैनपर्यंत वाढवावी – वंचित बहुजन आघाडीची मागणी

जामखेड, दि. २० जुलै २०२५ (प्रतिनिधी):पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या चौंडी ते इंदौर बस सेवेबाबत वंचित बहुजन आघाडीने समाधान व्यक्त करत ही सेवा उज्जैनपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जामखेड आगारात आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी म्हटले की, “पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी आपल्या कर्मभूमीवर जसे इंदौरमध्ये कार्य केले तसेच उज्जैन येथील श्री ,ज्योतिर्लिंग मंदिराचा देखील जिर्णोद्धार केला होता.त्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी लक्षात घेता ही बस सेवा इंदौरऐवजी उज्जैनपर्यंत चालवावी.”

या सेवेबाबत त्यांनी पुढे असेही सुचवले की, यात्रेकरूंना महाकालेश्वराचे दर्शन करता यावे यासाठी ही सेवा ‘रातराणी’ (नाईट सर्व्हिस) स्वरूपात असावी. यामुळे प्रवाशांना रात्री प्रवास करून सकाळपासून दर्शन घेण्याची सुविधा मिळेल. यामुळे महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होईल.

सदर सेवेसाठी जामखेड आगारातील चालक-वाहकांची नियुक्ती करावी, जेणेकरून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील व प्रवाशांना प्रामाणिक सेवा लाभेल तसेच सदर बस सेवेचा मार्ग चौंडी – जामखेड – अहिल्यानगर – शिर्डी – इंदौर – उज्जैन व तसेच तीर्थक्षेत्र ठिकाण पंढरपूर, अक्कलकोट,तुळजापूर,गाणगापूर साठी दहा वाहक व दहा चालक आणि सात बसेस देण्यात यावे.अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे .यावेळी जामखेड आगाराचे प्रभारी अगार व्यवस्थापक शशि खटावकर,सहाय्यक निरीक्षक
महादेव ढगे,चालक ए.पी.दहिफळे, चालक एम.डी.सोंडगे,एस.टी.झेंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ भैलुमे, युवक महासचिव संजय शेलार,वंचित बहुजन आघाडी जिल्हा युवक उपाध्यक्ष लखन पारसे, तालुकाध्यक्ष आतिश पारवे, वंचित बहुजन आघाडी कर्जत युवक तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव पदाधिकारी,आगार व्यवस्थापक आदी कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button