बीड

समाजसेविका सीमाताई ओस्तवाल यांना प्रतिष्ठित “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती आदर्श समाजस्वामिनी पुरस्कार” जाहीर!

समाजसेविका सीमाताई ओस्तवाल यांना प्रतिष्ठित “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती आदर्श समाजस्वामिनी पुरस्कार” जाहीर!

२०१० पासून अविरतपणे हजारो वंचित महिला, दिव्यांग, विद्यार्थी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मायेचा आधार देणाऱ्या ‘गुरु आनंद महिला प्रतिष्ठान’च्या अध्यक्षांचा होणार सन्मान

बीड (प्रतिनिधी)आपला सामाजिक बांधिलकीचा अखंड वारसा जपत गेल्या दीड दशकापासून बीड जिल्हा आणि परिसरात दीनदुबळे, वंचित, दिव्यांग आणि महिलांच्या उत्थानासाठी स्वतःचे आयुष्य झोकून देणाऱ्या ‘गुरु आनंद महिला प्रतिष्ठान’च्या संस्थापिका-अध्यक्षा श्रीमती सीमाताई ओस्तवाल यांना यंदाचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठित “त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती ‘आदर्श समाजस्वामिनी’ राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे. ‘ साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘युवा लोकमित्र परिवार’च्या वतीने या सर्वोच्च पुरस्काराची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
साप्ताहिक युवा लोकमित्र’ परिवारातर्फे समाजातील तळागाळातील घटकांसाठी काम करणाऱ्या खऱ्या कर्मयोग्यांचा शोध घेऊन त्यांना सन्मानित केले जाते. यंदाच्या उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने सीमाताई ओस्तवाल यांनी २०१० पासून शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि आपत्कालीन मदती क्षेत्रात केलेल्या अथांग कार्याची दखल घेऊन या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांची एकमुखाने निवड केली आहे.
सीमाताई ओस्तवाल यांनी केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून समाजकारण सिद्ध केले आहे. ‘गुरु आनंद महिला प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी आजवर तब्बल ९०० गरीब महिला व मुलींना मोफत ब्युटी पार्लरचा व्यावसायिक कोर्स शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे. त्यासोबतच, २०१० पासून हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी शिक्षणाची कवाडे खुली ठेवली आहेत. गेल्या वर्षीच त्यांनी बीड जिल्ह्यातील तब्बल २२५ शाळांमध्ये जाऊन शालेय साहित्याचे वाटप करत एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.शहरातील व ग्रामीण भागातील कोणतीही वंचित माऊली सणासुदीला उपाशी राहू नये, या उदात्त भावनेतून २०१० पासून सीमाताई दरवर्षी ग्रामीण व शहरी भागातील भूमिहीन, अपंग आणि निराधार अशा १००० कुटुंबांना दिवाळीनिमित्त मोफत किराणा कीट व फराळाचे वाटप करतात. झोपडपट्टीतील अत्यंत गरीब महिलांना नवीन साड्या आणि लहान मुलींना नवीन कपडे व ड्रेस वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे महान कार्य त्या अविरतपणे करत आहेत.वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे, २०२५ मध्ये झालेल्या भीषण अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. अन्नदात्याचे हे अश्रू पाहून सीमाताईंनी तात्काळ धाव घेत ५०० हून अधिक अतिवृष्टीग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिवाळीनिमित्त किराणा कीट आणि जीवनावश्यक साहित्याचे मोफत वाटप करून मोठा दिलासा दिला होता. याशिवाय, समाजातील दुर्लक्षित घटक असलेल्या दिव्यांगांना दरवर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने किराणा कीट आणि आर्थिक मदत पुरवली जाते.सीमाताई ओस्तवाल यांच्या या निस्पृह सेवेमुळे त्यांना यापूर्वी ‘विद्यार्थी प्रिय समाजसेविका पुरस्कार’, ‘लोक रत्न पुरस्कार’, ‘जय भीम महोत्सवातील विशेष सन्मान’ आणि नाशिकच्या श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्टचा प्रतिष्ठित ‘प्रेरणादायी पुरस्कार’ अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता त्यांच्या याच शिरपेचात ‘माता रमाई आंबेडकर स्मृती आदर्श समाजस्वामिनी’ या सर्वोच्च पुरस्काराचा तुरा रोवला जात आहे.हा दिमाखदार सोहळा येत्या शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ‘ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते सीमाताईंचा गौरव केला जाईल.

||चौकट||
“त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या कल्याणासाठी त्याग केला. तोच त्यागाचा आणि कारुण्याचा वारसा सीमाताई ओस्तवाल बीडच्या मातीत चालवत आहेत. ९०० हून अधिक मुलींना स्वावलंबी करणे, हजारो गरीब घरे किराणा देऊन उजळवणे ही सामान्य बाब नाही. अशा खऱ्या ‘समाजस्वामिनी’चा सन्मान करताना युवा लोकमित्र परिवाराला सार्थ अभिमान वाटत आहे.”
— शेख ताहेर जाफर
संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, महिला भगिनी, शेतकरी वर्ग, शैक्षणिक क्षेत्रातून सीमाताई ओस्तवाल यांच्यावर अभिनंदनाचा उत्स्फूर्त वर्षाव होत आहे.

Back to top button