जामखेड हादरलं : आठ दिवसांत विजेच्या शॉकने तिसरा बळी

जामखेड हादरलं : आठ दिवसांत विजेच्या शॉकने तिसरा बळी
१२ वर्षीय प्रणवचा फ्लेक्स पाईपमुळे जागीच मृत्यू; महावितरणचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर
जामखेड प्रतिनिधी –खर्डा चौकाजवळील टेकाळे नगरमध्ये सोमवारी (दि. ३० जून) सायंकाळी १२ वर्षीय प्रणव प्रशांत टेकाळे या चिमुरड्याचा विजेच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू झाला. क्रिकेट खेळताना स्लॅपवर गेलेला बॉल काढण्यासाठी फ्लेक्सचा लोखंडी पाईप वापरत असताना तो घराजवळून जाणाऱ्या ११ केव्ही मुख्य विज वाहिनीच्या संपर्कात आल्याने हा अपघात घडला.
प्रणव टेकाळे आपल्या मित्रांसोबत खेळत असताना बॉल स्लॅपवर गेला. बॉल काढताना त्याच्या हातातील पाईप लाईटच्या तारांना लागल्याने जोरदार विजेचा धक्का बसला. जवळच असलेल्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
ही घटना समजताच संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, तीन तास उलटल्यानंतरही महावितरणचे एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते, याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
*आठ दिवसात तिघांचा मृत्यू – महावितरणची निष्क्रियता?*
या अपघाताआधी बाळगव्हाण येथे वडील आणि मुलगा उसाच्या शेतात काम करत असताना विजेच्या तारांना चिकटून मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेनंतर बाळगव्हाण येथील वायरमनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता प्रणव टेकाळेच्या मृत्यूने महावितरणच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



