बीड

एफआरएस व लाडक्या बहिणीच्या फेरसर्वेक्षणावरून अंगणवाडी ताईंनी बजावला इशारा

एफआरएस व लाडक्या बहिणीच्या फेरसर्वेक्षणावरून अंगणवाडी ताईंनी बजावला इशारा
—-
९ सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मतनिस महासंघाचा मुंबईत भव्य मोर्चा
प्रतिनिधी | बीड:-अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्यावर सरकारकडून टाकण्यात येणाऱ्या वाढत्या कामाच्या ताणाविरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. एफआरएस, पोषण ट्रॅकर अॅप, प्रधानमंत्री मातृवंदना योजना व ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे फेरसर्वेक्षण यांसारखी जबाबदारी अंगणवाडी ताईंवर लादू नये, अशी ठाम मागणी करत येत्या ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता आझाद मैदान, मुंबई येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख , प्रदेश उपाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, बीड जिल्हा संघटक सचिन अंधळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना मुळ काम सोडून इतर कामात गुंतवले जात असल्यामुळे मुलांचे पूर्वशालेय शिक्षण व पोषण सुधारणा या मुख्य उद्दिष्टावर विपरित परिणाम होत आहे.
——–
एफआरएस व पोषण ट्रॅकरची अडचण
——–
सध्या एफआरएस आणि पोषण ट्रॅकर अॅपच्या माध्यमातून काम दिले आहे. दोन महिन्यांचा टीएचआर   एकदाच वाटप करावा लागतो, मात्र दर महिन्याला टीएचआर वाटल्याचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. निकृष्ट दर्जाचा टीएचआर लाभार्थ्यांना मिळत असून, फोटो अपलोड करतानाही मोठ्या अडचणी येतात. सेविकांकडे ४ जी मोबाईल असून सरकारचे अॅप ५जीवर चालते. त्यामुळे सरकारने सेविकांना ५जी मोबाईल द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
——–
‘लाडकी बहीण’ योजनेवर वादाची शक्यता
——-
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत पात्र-अपात्र तपासणीचे काम अंगणवाडी सेविकांकडे दिले आहे. मात्र गावातच एखादी लाभार्थी अपात्र ठरवावी लागल्यास त्यातून थेट अंगणवाडी ताईंवर हाणामारी, वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे काम अंगणवाडी ताईंवर सोपवू नये, असा इशारा महासंघाने दिला आहे.
——-
अपूर्ण मानधनवाढीचा मुद्दा
——–
ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने सेविकांना ५ हजार आणि मदतनिसांना ३ हजार रुपयांची मानधनवाढ जाहीर केली होती. मात्र आजपर्यंत ती पूर्णपणे लागू झालेली नाही, असा आरोपही संघटनेकडून करण्यात आला.
——–
पंतप्रधान मातृवंदना योजनेला बहिष्कार
——–
एफआरएस, पोषण ट्रॅकर, पीएमएमव्हीवाय (प्रधानमंत्री मातृ वंदना योजना) या कामांचा प्रचंड ताण अंगणवाडी सेविकांवर आला आहे. त्यामुळे मुळ अंगणवाडीचे काम मागे पडले असून लाभार्थींची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमएमव्हीवाय योजनेच्या कामावर अंगणवाडी सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
——
मोर्चात हजारो सेविकांचा सहभाग अपेक्षित
९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील मोर्चात राज्यभरातून हजारो अंगणवाडी सेविका-मदतनिस सहभागी होणार आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर निदर्शने आणखी तीव्र करण्याचा इशारा महासंघाने दिला आहे.
——–
जिल्हा  प्रशासनाकडून दबाव तंत्राचा वापर
प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंमलबजावणीस नकार देणऱ्या अंगणवाडी सेविका विरूध्द प्रशासकीय कार्यवाही करावे असे पत्र जिल्हा कार्यकम अधिकारी जिल्हा परिषद बीडचे मनोज ससे यांनी सर्व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना काढले होते.  महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख व जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांची दूरध्वनी द्वारे चर्चा झाल्यानंतर जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी कारवाई करणार नाही असे ठोस आश्वासन दिले. सूचना सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
Back to top button