महाराष्ट्र

“कुष्ठमुक्तीच्या वाटेवर अमरावती : केंद्रिय तज्ज्ञांची सर्वंकष पाहणी”

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनाच्या ध्येयाने सज्ज असलेल्या अमरावती जिल्ह्याची केंद्र शासनाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने सखोल पाहणी करत सर्वांगीण तपासणी केली. तमिळनाडूतील चेंगलपट्टू येथून विशेष अभ्यासदौर्‍यावर आलेल्या डॉ. समांथ्वा सेलवन यांनी दोन दिवसांच्या भेटीत जिल्ह्यातील उपचारव्यवस्था, शोध मोहीम आणि प्रतिबंधक उपक्रमांचा थेट आढावा घेतला.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्याशी संवादात त्यांनी अमरावती जिल्ह्याने राबवलेली रणनीती समाधानकारक असल्याचे मत व्यक्त केले. “नवीन रुग्णांचे लवकर निदान आणि तत्पर औषधोपचार हीच संसर्गसाखळी खंडित करण्याची गुरुकिल्ली ठरेल,” असा विश्वास डॉ. सेलवन यांनी व्यक्त केला.

अभ्यासदौरात त्यांनी माहुली जहागीर प्राथमिक आरोग्य केंद्र, अमरावती महानगरपालिकेतील दस्तूरनगर शहरी आरोग्य केंद्र तसेच तपोवन परिसरातील आरोग्य पथके यांना भेट देत तेथील पायाभूत सुविधा, नोंदणी प्रक्रिया आणि उपचार पद्धतींची तपासणी केली. रुग्णांशी संवाद साधत आरोग्य यंत्रणेचे कार्य आणि जनजागृती उपक्रमांनी कुष्ठरोग निर्मूलनाला नवचैतन्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पाहणीदरम्यान सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, डॉ. विनंती नवरे, पर्यवेक्षक दीपक गडलिंग, श्री. पन्हाळे, रमेश सोनार, तसेच कुष्ठरोग तंत्रज्ञ रितेश ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.

अभ्यासदौरामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाला नवी दिशा आणि बळ मिळणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला.

Back to top button