📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

१७ सप्टेंबरला बीड-पुणे रेल्वे धावणार; स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा

१७ सप्टेंबरला बीड-पुणे रेल्वे धावणार; स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा

बीडच्या रेल्वे चळवळीतील दीर्घ लढ्याला यश; १७ सप्टेंबरपासून पुण्याशी थेट रेल्वे जोडणी
बीड
बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड-पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक व सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. अनेक वर्षांपासून बीडकरांची असलेली रेल्वेची प्रतीक्षा आता संपुष्टात येत असून, या सेवेमुळे बीड आणि पुणे दरम्यानच्या प्रवासाला नवे दळणवळणाचे साधन उपलब्ध होणार आहे.
बीड रेल्वेच्या प्रश्नासाठी स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीने अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. विविध आंदोलने, निवेदने आणि जनजागृतीच्या माध्यमातून समितीने रेल्वे प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू होणे हा या दीर्घकालीन प्रयत्नातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, डिसेंबरअखेर बीड-मुंबई पनवेल रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समितीचे अध्यक्ष जवाहरलाल मदनलाल सारडा, सहसचिव रवि उबाळे, उपाध्यक्ष अशोकराव शेटे, कोषाध्यक्ष विष्णुदास बियाणी, प्रसिद्धीप्रमुख वैभव स्वामी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक, स्वातंत्र्य सैनिक आणि सदस्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू होत असल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.
—–
बीडच्या रेल्वे चळवळीतील महत्त्वाचा टप्पा
बीड जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर आंदोलने आणि पाठपुरावा करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मदनलाल सारडा यांनी बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांना एकत्रित करून या समितीची स्थापना केली होती. मागील तीस ते पस्तीस वर्षापासून या समितीकडून रेल्वे येण्यासाठी विविध स्तरावरून पाठपुरावा केला. बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू होणे हा या चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, यामुळे बीडच्या दळणवळण आणि विकास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
– जवाहरलाल मदनलाल सारडा, अध्यक्ष, स्वातंत्र्य सैनिक रेल्वे आंदोलन समिती बीड
Back to top button