बीड
कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पाचे पाणी लवकरच नदीपात्रात सोडणार!

कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पाचे पाणी लवकरच नदीपात्रात सोडणार!
प्रशासनाचे ग्रामस्थांना आश्वासन; शुक्रवारी होणारे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):-उन्हामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई आणि पशुपक्षी तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केली होती. गुरुवारी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन शुक्रवारी होणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची विनंती करून पाणी सोडण्याचे ठोस आश्वासन दिले. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ आलेली असून आंदोलनामुळे जयंतीच्या उत्साहात व्यत्यय येऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत. येत्या 20 एप्रिल पर्यंत पाणी सोडले नाही तर 22 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राजेभाऊ फड यांनी दिला आहे.
याबाबत अधिक असे की, कन्हेरवाडी लघुसिंचन प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेभाऊ फड यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. पाणी न सोडल्यास दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता लोंढे, तलाठी विष्णू गित्ते, परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महझरअली तसेच प्रशासनातील अन्य अधिकाऱ्यांनी कन्हेरवाडी गावात जाऊन हनुमान मंदिर येथे बैठक घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. देशभरात याचा मोठा उत्साह असतो. आंदोलनामुळे कुठल्याही कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. तसेच येत्या 20 एप्रिल पर्यंत पाणी नदीपात्रात सोडण्याची कारवाई होईल असे आश्वासन तहसीलदार यांनी देऊन उद्याचे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही आंदोलन स्थगित केले आहे, मागे घेतलेले नाही. 20 एप्रिल पर्यंत पाणी नदीपात्रात सोडण्यात आले नाही तर येत्या 22 एप्रिल रोजी स्थगित केलेले आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी दिला. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन मिनिनाथ दादा फड, माजी उपसरपंच रामहरी फड, पोलिस पाटील प्रल्हाद मुंडे, एच.यू.फड, बाबासाहेब फड, वसंत मुंडे, प्रशांत रोडे, मधुकर मुंडे टेलर, नवनाथ अप्पा फड, नाथराव फड, सुरेश घाडगे, महादेव मामा मुंडे, हरीकिशन बहिरे, संतोष मुंडे, वैजनाथ रोडे, ज्ञानेश्वर फड, समाधान मुंडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.



