संपादकीय

शिंदे सर्मथकांनी केलेल्या तोडफोडीनंतर शिंदे यांनी मागितली पवारांची माफी

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शशिकांत शिंदे यांच्याच समर्थकांनी ही दगडफेक केली आहे. त्यामुळे, आमदार शशिकांत शिंदे यांनी दगडफेकीबद्दल माफी मागितली आहे.

साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर राष्ट्रवादीचा झेंडा असून कार्यालयात शरद पवार यांचा फोटो आहे. त्याच, कार्यालयावर शशिकांत शिंदेंच्या नावाने घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्यानंतर, आमदार शिंदे यांनी शरद पवार यांची माफी मागत, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलंय.

माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. तसेच, माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रयत्न केले. पण, मी एका मताने पराभूत झालो, तो पराभव मी स्वीकारतो, असेही शिंदेंनी म्हटलं आहे.

ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, शरद पवार, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, असे शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे, शरद पवार यांनाही ते माहिती आहे. मी एकनिष्ठ कार्यकर्ता असून त्यांच्यासाठी जीव देईन, असे म्हणत आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.

Back to top button