बीड
बीड न.प.चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचा डॉ.योगेश क्षीरसागरांकडून सत्कार

बीड न.प.चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचा डॉ.योगेश क्षीरसागरांकडून सत्कार
बीड (प्रतिनिधी)
दि. २१ : बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नुकतीच बदली होऊन त्यांची नांदेड येथे सहआयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
फडसे यांच्या कार्यकाळाचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी बीड नगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या समजून घेत त्या शासनस्तरावर मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शहरातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच रखडलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी प्रभावीपणे काम केले. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना त्यांनी पारदर्शकता, शिस्त आणि जनहिताला प्राधान्य दिले. कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमबद्ध व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिकांमध्येही त्यांच्याविषयी सकारात्मक भावना निर्माण झाल्या असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची समाजाला नेहमीच गरज असते. फडसे यांनी बीडमध्ये केलेल्या कार्याप्रमाणेच नव्या जबाबदारीतही ते लोकसेवेची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या सत्कार समारंभास भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांच्यासह नगरपरिषदेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



