राजमाता जिजाऊसाहेब व सावित्रीबाईंच्या विचारांतून विद्यार्थ्यांनी घडवावा उज्वल भविष्याचा पाया – प्राचार्य पारखे

राजमाता जिजाऊसाहेब व सावित्रीबाईंच्या विचारांतून विद्यार्थ्यांनी घडवावा उज्वल भविष्याचा पाया – प्राचार्य पारखे
ल.ना. होशिंग विद्यालयात महान स्त्रीशक्तीला अभिवादन
जामखेड | प्रतिनिधी
राजमाता जिजाऊसाहेब भोसले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन म्हणजे त्याग, संघर्ष आणि समाजपरिवर्तनाची जिवंत शाळा आहे. या महान विभूतींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवत आपले व शाळेचे नाव उज्ज्वल करावे,असे मनोगत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी सांगितले.
दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊसाहेब भोसले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तसेच महिला मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य पारखे यांनी दोन्ही महापुरुषी स्त्रियांच्या कार्याचा गौरव करत विनम्र अभिवादन केले. तसेच जयंतीनिमित्त महिला शिक्षकांनी अतिशय सुंदर व प्रेरणादायी कार्यक्रम साकारल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक अनिल देडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात रेश्मा कारंडे यांनी राजमाता जिजाऊसाहेब व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. यावेळी बाल चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थिनींची भाषणे तसेच आम्ही सावित्रीच्या मुली, बालदिवस, नाटिका, भारुड, गवळण, मी सावित्री बोलते या एकपात्री प्रयोगासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.
अध्यापिका मनोगतात स्वाती हांगे यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण व समतेसाठी केलेल्या संघर्षाचा आढावा घेत आज महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीचे श्रेय त्यांच्या कार्याला दिले. ३ जानेवारी १८३१ रोजी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी अमानवी प्रथांविरोधात निर्भीडपणे लढा देत समाजाला नवी दिशा दिली, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना स्वप्नाली घाडगे यांनी मांडली तर अनुमोदन शितल जगदाळे यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साई भोसले व महिला शिक्षिका यांनी काम पाहिले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका संगिता दराडे,वंदना अल्हाट,सुप्रिया घायतडक,पूजा भालेराव,स्वाती बांगर,स्वप्नाली घाडगे,रेश्मा कारंडे,प्रभा रासकर,प्रियांका सुपेकर,शितल जगदाळे,स्वाती गिरी,मोहिनी उगले यांनी उत्तम नियोजन केले. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना अल्हाट व सुप्रिया घायतडक यांनी केले तर आभार प्रदर्शन संगिता दराडे यांनी मानले.



