बीड
शिक्षणाधिकाऱ्याचा बेजबाबदारपणा भोवला!;तरनळीच्या सानप वस्तीची शाळा झाली भुईसपाट!

शिक्षणाधिकाऱ्याचा बेजबाबदारपणा भोवला!;तरनळीच्या सानप वस्तीची शाळा झाली भुईसपाट!
*पावसात आणि रात्रीच्या वेळी दुर्घटना घडल्याने मोठी जिवीत हानी टळली!; सानपवस्तीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य उघड्यावर!*
============================== ============================== ======
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील लव्हूरी केंद्रांतर्गत डोंगरी व दुर्गम भागात चालणाऱ्या तरनळी येथील सानपवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीचे छतासह भिंती गुरुवारी रात्री कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आसले तरी शाळेला सुट्टी आसताना ही दुर्घटना घडल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. उर्वरित कार्यालयासह एक वर्गखोली सुद्धा धोकादायक असल्याचे दिसून आले.
या बाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील तरनळी गावच्या डोंगरी व दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सानपवस्तीच्या पहिली व दुसरीच्या वर्गाच्या वर्गखोलीचे छतासह भिंती गुरूवारी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रात्री ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान कोसळल्यामुळे बाजूच्या भिंतीलाही तडे गेले आसून, खिडकी व दरवाजा दूर अंतरावर जाऊन पडले आहेत.
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत चे ९ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आसून या वस्ती शाळासाठी एक कार्यालय व २ वर्ग खोल्या आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार १० ते १५ वर्षांपूर्वी डोंगराच्या बरगडीला बांधण्यात आलेल्या या शाळेचे बांधकाम जीर्ण झाले आहे.
१५ जून २०२६ रोजी शाळा भरल्या दिवशीच या वर्गखोलीच्या छताचे प्लास्टर गळून पडण्याची दुर्घटना झाली होती. त्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत उजगरे यांनी केजचे गटशिक्षणाधिकारी व बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन सानप वस्ती शाळेच्या इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली होती.
शाळेला सुट्टी आसताना व रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडल्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. परंतु वर्गखोलीचे छतासह भिंती कोसळल्यामुळे व रात्रीच्या वेळी कांही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या वर्ग खोलीत ठेवलेले शालेय पोषण आहार, व ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या हंगामी विद्यार्थी वसतिगृहाच्या कागद पत्र व दास्तावेजची मोठी हानी झाल्याची माहिती मुख्याध्यापक श्रीकांत उजगरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
तरनळीचे सरपंच महादेव खेडकर उपसरपंच शिवाजी मोहिते,पोलीस पाटील अशोक मोहिते व ग्रामपंचायत सदस्य बंडू सानप आणि या भागातील नागरिकांनी शाळेला भेट देऊन या दुर्घटनेची पाहणी व पंचनामा केला आहे. तर शनिवार रोजी लव्हुरी केंद्राचे केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे यांनी शाळेला भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला आहे.
——चौकट—–
आम्ही तरनळी येथील सानप वस्तीवरील रहिवासी नागरिक आहोत. आम्ही डोंगरी दुर्गम भागात राहत आहोत. पर राज्यात जाऊन ऊस तोडणीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. गेल्या वर्षी या शाळेत आमचे २० विद्यार्थी शिक्षण घेत होते परंतु यावर्षी जून महिन्यात शाळा भरायच्या पहिल्याच दिवशी शाळेच्या इमारत खोलाचा छत पडण्यास सुरुवात झाली. आम्ही भीतीपोटी आमची काही मुले दुसऱ्या शाळेत पाठवली आहेत तर उर्वरित बाकीची मुले याच शाळेत शिक्षण घेत आहेत परंतु या धोकादायक इमारती पासून आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे आम्ही ऊस तोडणी साठी कारखान्याला गेल्यावर आमची मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात म्हणून शासनाने तात्काळ आमच्या सानप वस्तीवर नवीन शाळेची इमारत बांधून देऊन पूर्वीप्रमाणे ज्ञानदान देण्याचे काम करावे.
स्थानिक नागरिक व पालक
——चौकट——-
दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ठीक १०-२० वाजता सदर शाळेला भेट दिली असता पुढील बाबी दिसून आल्या, सदर शाळेला दोन षटकोनी वर्ग खोल्या उपलब्ध आहेत परंतु दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायं. ६ ते ७ वाजण्याच्या कालावधीत १ षटकोनी वर्ग खोलीचा छत व भिंती कोसळलेल्या आहेत. या कालावधीत सदर वर्गखोली पडली आहे यात कोणतीही जीवितहानी झालेली दिसून आली नाही. उर्वरित एक वर्ग पोलीस सुद्धा धोकादायक असल्याचे दिसून आले. सदर शाळेला त्वरित नवीन इमारत होणे आवश्यक आहे. —-केंद्रप्रमुख राधाकृष्ण कांबळे



