📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

मसेवाडी येथील शेतकऱ्यांचे सोलर पॅनल चोरीला  

मसेवाडी येथील शेतकऱ्यांचे सोलर पॅनल चोरीला
विद्युत मोटार व वायर चोरीनंतर सोलर पॅनल चोरट्यांचेही धाडस; शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
लिंबागणेश : (दि.८)बीड तालुक्यातील बालाघाटावरील मसेवाडी येथील शेतकरी सिद्धार्थ बंकट मोरे यांच्या गट क्रमांक ८ मधील शेतातून सोलर पॅनल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लिंबागणेश पोलिस चौकीचे पोलीस हवालदार शेख मन्सूर यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सिद्धार्थ मोरे यांचे शेजारी बाबुराव लक्ष्मण मोरे यांनी त्यांच्या शेतातील सोलर पॅनल गायब असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच एक सोलर पॅनल शेतालगत आढळून आले. त्यानंतर सिद्धार्थ मोरे यांनी शेतात पाहणी केली असता सोलर पॅनल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
लिंबागणेश परिसरात यापूर्वीही विद्युत मोटार व विद्युत वायर चोरीच्या घटना घडत असताना आता सोलर पॅनल चोरीची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून शेतीसाठी वीज उपलब्ध करून घेणाऱ्या शेतकऱ्यांना अशा चोरीच्या घटनांमुळे आर्थिक फटका बसत आहे.
एकीकडे पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती, तर दुसरीकडे शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची चोरी; त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.
सोलर पॅनल चोरीच्या या घटनेची पोलिस प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून चोरट्यांचा शोध घ्यावा, चोरीस गेलेले सोलर पॅनल परत मिळवून द्यावेत आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
 डॉ. गणेश ढवळे, लिंबागणेशकर**
मो. ८१८०९२७५७२
Back to top button