शिव, फुले, आंबेडकरांची एकत्र जयंती – जामखेड बनलं राज्याचं लक्षवेधक केंद्र

शिव, फुले, आंबेडकरांची एकत्र जयंती – जामखेड बनलं राज्याचं लक्षवेधक केंद्र
राज्याच्या नेत्यांची एकत्र उपस्थिती ; जामखेडमध्ये इतिहास घडणार!
जामखेड शहरात संध्या सोनवणे यांचा प्रेरणादायी सोहळा
जामखेड प्रतिनिधी:-जामखेडमध्ये येत्या १७ एप्रिल रोजी शिव, फुले, आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश निमोणकर उपस्थित होते.
संध्या सोनवणे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला संयुक्त जयंती महोत्सव आता राज्यभर एक प्रेरणादायी उपक्रम म्हणून ओळखला जातो. यंदाचा महोत्सव जामखेड महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी (१७ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा “शिंदे शाही बाणा” आणि अभिजीत जाधव व अमू जाधव यांचा “शिवशंभो गर्जना” विशेष आकर्षण ठरणार आहे.महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
संध्या सोनवणे यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक समता, एकता आणि सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या वर्षी महोत्सवाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाही नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे.या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
या भव्य सोहळ्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संध्या सोनवणे यांनी पत्रकार परिषदेतून केले.



