प्रथम पसंतीचे मतदान देऊन बसवराज पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या-आ.सुरेश धस

प्रथम पसंतीचे मतदान देऊन बसवराज पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या-आ.सुरेश धस
***************************
आष्टीतील संवाद बैठकीत बसवराज पाटील यांच्या विजयाचा निर्धार
*************************
आष्टी (प्रतिनिधी)
लातूर-बीड-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आष्टी येथील अद्वैतचंद्र निवास येथे आयोजित संवाद बैठकीत महायुतीच्या पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीचे जोरदार प्रदर्शन केले. यावेळी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थितांना संबोधित करत बसवराज पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान करून विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
आ.सुरेश धस म्हणाले की, राजकारण हे केवळ पक्षीय सीमा आणि मतभेदांपुरते मर्यादित नसून जनतेच्या विकासाशी निगडित असते.केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम आणि अभ्यासू नेतृत्व विधान परिषदेत पोहोचणे गरजेचे आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. अनेकदा वैयक्तिक हेवेदावे आणि राजकीय मतभेद विकासाच्या आड येतात, मात्र जनतेच्या हितासाठी ते बाजूला ठेवणे आवश्यक आहे. बसवराज पाटील यांच्यासारखे अनुभवी, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व विधान परिषदेत गेले तर मराठवाड्याच्या विकासाला नवी गती मिळेल.ते पुढे म्हणाले की, बसवराज पाटील यांचा राजकीय प्रवास हा सातत्य, संघर्ष आणि जनसंपर्काचा आदर्श आहे. १९९९ पासून त्यांनी राजकारणात अखंड कार्य करत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांची कार्यपद्धती, नम्र स्वभाव आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांची मोठी ताकद आहे. म्हणूनच पक्षीय सीमा ओलांडून अनेक लोकप्रतिनिधी त्यांना पाठिंबा देत आहेत. विधान परिषदेत त्यांची निवड झाल्यास लातूर, बीड आणि धाराशिव या तीनही जिल्ह्यांच्या प्रश्नांना सक्षम आवाज मिळेल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील यांनी आपल्या भाषणात आ. सुरेश धस यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, हा मतदारसंघ महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने आ.सुरेश धस यांचा सारखा सक्षम नेता दिला आहे. त्यांनी आपल्या धडाडीच्या नेतृत्वातून आणि विकासकामांच्या पाठपुराव्यातून आष्टी मतदारसंघाला राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
“लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी कसे झटावे, प्रशासनाकडून कामे कशी करून घ्यावीत आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष कसा करावा, हे मी सुरेश धस यांच्याकडून शिकलो आहे,” असे गौरवोद्गार बसवराज पाटील यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, माझा आणि धस साहेबांचा चार दशकांहून अधिक काळाचा राजकीय सहवास आहे. उमेदवारी जाहीर होताच सर्वप्रथम धस साहेबांशी संवाद साधला. त्यांनी ज्या विश्वासाने आणि ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहून साथ दिली आहे, तो माझ्यासाठी मोठा आधार आहे. यापुढे मराठवाड्याच्या विकासासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे.
आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पक्षीय सीमा उलाडून बैठकीत उपस्थित लोकप्रतिनिधींनी महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचे स्वागत करत बसवराज पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि वरिष्ठ सभागृहात सक्षम प्रतिनिधित्व निर्माण करण्यासाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी आ.अभिमन्यू भैय्या पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,वाल्मीक तात्या निकाळजे,गणेश शिंदे,माऊली जरांगे, विठ्ठल बदुले, रामराव गिते, रंगनाथ धोंडे, रोहीदास भाऊ गाडेकर, गणेश नारायणकर, प्रतिभा गाडेकर, दिपाली जाधव,जिया बेग, रमेश गावडे, अनिल ढोबळे, सुरेश उगलमुगले, भागवत येवले, अरुण भैय्या निकाळजे, अरुण भालेराव, यशवंत खंडागळे, रामदेव बद्दर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.



