बीड
रोटरी क्लबच्या पाणपोईचे गेवराईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभारंभ

रोटरी क्लबच्या पाणपोईचे गेवराईत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुभारंभ
गेवराई, दि.२४ (प्रतिनिधी) – सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ गेवराईच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली. ग्रामीण भागातून विविध कामानिमित्त शहरात येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्यात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन रोटरी क्लबच्या संचालक मंडळ व सदस्यांनी सेवा कार्य म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. दि.१५ मे २०२६ रोजी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 चे गव्हर्नर रो. सुधीर लातुरे यांच्या हस्ते फीत कापून तसेच रोटरी फलकाला पुष्पमाला अर्पण करून पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी डॉ. राजगोपाल तापडिया, सहप्रांतपाल रो. कल्याण कुलकर्णी व रो. नितिन गोपन यांचे स्वागत बालाजी किराणा मालक सुरेश मानधने, रो. रामदास शिंदे, प्रा. रामप्रभु मुंडे आणि सेवानिवृत्त प्राचार्य रो. नागनाथ घसिंग यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी “गरजवंत ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे हे अत्यंत पुण्याचे कार्य असून रोटरी क्लबचे हे कार्य कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र बरकसे यांनी केले तर आभार सचिव रो. प्रविण जैन यांनी मानले. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ गेवराईचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र बरकसे, सचिव रो. प्रविण जैन, सहसचिव डॉ. नागनाथ मोटे, क्लब प्रशासक रो. गणेश कुलकर्णी, रो. राजेंद्र डेंगे, प्रोजेक्ट सर्विस चेअरमन धर्मराज करपे, राधाकिसन लड्डा यांच्यासह अनेक रोटेरियन व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



