बीड

होळ उपकेंद्रासाठी १० एमव्हीए रोहित्र मंजुरी प्रक्रियेला गती; ‘महावितरण’ने प्रस्ताव पाठविला

होळ उपकेंद्रासाठी १० एमव्हीए रोहित्र मंजुरी प्रक्रियेला गती; ‘महावितरण’ने प्रस्ताव पाठविला
‘महावितरण’च्या आश्वासनानंतर कुलदीप करपेंचे आंदोलन स्थगित
केज (प्रतिनिधी)दि.२० : तालुक्यातील होळ येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र बसविण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन महावितरण कंपनीकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि.२०) स्थगित करण्यात आले आहे.
होळ उपकेंद्राच्या क्षमतेअभावी परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांना कमी दाब, वारंवार खंडित होणारा पुरवठा आणि शेतीपंपांच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने ११ डिसेंबर २०२५ रोजी निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत बीडचे अधिक्षक अभियंता यांनी ३३/११ केव्ही होळ उपकेंद्रात १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्याबाबतचा प्रस्ताव १९ डिसेंबर २०२५ रोजी महावितरण कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. महावितरण कंपनीच्यावतीने होळचे कनिष्ठ अभियंता अभिजित पाटील यांनी लेखी स्वरूपात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी सुरू केलेले बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित केले. मंजुरीनंतर तातडीने कामास प्रारंभ करून उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, रोहित्राची क्षमता वाढल्यास होळ परिसरातील शेतीपंप व घरगुती वीजपुरवठा अधिक स्थिर व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Back to top button