📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

न्याय, स्वाभिमान आणि स्त्रीसन्मान हीच स्वराज्याची खरी ओळख – प्रा.अंकुश निर्मळ

न्याय, स्वाभिमान आणि स्त्रीसन्मान हीच स्वराज्याची खरी ओळख – प्रा.अंकुश निर्मळ

राजे मल्हारराव होळकर निवासी वसतिगृहात शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न

बीड (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची प्रेरणा जागवण्याचे महान कार्य राजमाता जिजाऊंनी केले. रयतेला न्याय, महिलांना सन्मान आणि समाजात स्वाभिमान निर्माण व्हावा, याच उदात्त ध्येयातून स्वराज्याची संकल्पना आकारास आली, असे प्रतिपादन धनगर कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.अंकुश निर्मळ यांनी केले.

तुलसी शैक्षणिक समूह संचलित राजे मल्हारराव होळकर निवासी वसतिगृह, बीड येथे गुरुवार दि. १९ रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान व बक्षीस वितरण सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे होते.तर, प्रमुख अतिथी म्हणून मल्हार सेना बीडचे जिल्हाप्रमुख मा.अमर ढोणे, मा.बळीराम खरात, डॉ.सुनील जोंधळे तसेच प्रा.डी.डी.राऊत उपस्थित होते.

प्रा.अंकुश निर्मळ यांनी बिरुदेव ढोणे यांच्या कार्याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना सांगितले की, शिक्षण हीच उन्नतीची खरी वाट आहे. उच्च पदांची स्वप्ने पाहा आणि स्पर्धा परीक्षांसाठी सातत्याने परिश्रम घ्या. मात्र केवळ पद किंवा नोकरी मिळवणे हेच यश नसून सद्गुण, चारित्र्य जोपासून एक सक्षम नागरिक बनणे हेच खरे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख पाहुणे अमर ढोणे यांनी, संस्थेच्या संघर्षाचे खरे यश विद्यार्थ्यांच्या आनंदात दिसून येते, असे सांगत शिवविचारांच्या मार्गाने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा.प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधावा, प्रभावी वक्तृत्व विकसित करावे आणि प्रत्येक स्पर्धेत उत्साहाने सहभाग घ्यावा, असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठरापगड सवंगड्यांच्या मैत्रीचा आदर्श घेऊन निष्ठावान, प्रेरणादायी मित्र निवडावेत, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी वसतिगृहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना शिवरायांच्या विचारांतून प्रेरणा घेत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.किशोर वाघमारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा.गीतांजली वाघमारे तर आभार प्रदर्शन प्रा.डी.डी.राऊत यांनी मानले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.मगन ओव्हाळ, सत्यजित सावंत, आरती सावंत, वर्षा ढोकणे, शीतल खराद व गौरव विद्यागर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button