महाराष्ट्र

योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करा

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या दीड वर्षांपासून राज्यातील सर्व चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता कोरोना संसर्ग आटोक्यात येत असून चित्रपट गृह सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

त्याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध मंत्र्यांची सह्याद्री अतिथिगृहात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील चित्रपटगृहांनी योग्य त्या सुरक्षा तपासण्या करूनच चित्रपटगृहे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सिनेमागृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला आहे. मात्र, 5 टक्के क्षमतेची अट शिथिल करावी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहाना कसा दिलासा देता येईल यासाठी योग्य तो तोडगा वित्त विभागाच्या समन्वयाने काढण्यात येईल.

सह्याद्री अतिथी गृहात पार पडलेल्या बैठकीपूर्वी सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह उपस्थित होते.

Back to top button