बीड
टाकळी पैठणच्या लेंडी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन; ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश

टाकळी पैठणच्या लेंडी नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन; ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश
पैठण | किरण काळे
तालुक्यातील टाकळी पैठण येथील लेंडी नदीवरील बहुप्रतिक्षित पुलाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नातून या पुलासाठी निधी मंजूर झाला असून, संत एकनाथ कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे व उपसरपंच चंद्रहार लाटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून लेंडी नदीवरील पुलाच्या दुरावस्थेमुळे टाकळी परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात नदीला पूर आल्यास गावाचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होत होती. शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच दैनंदिन ये-जा करताना नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत होता.
या समस्येची गंभीर दखल घेत विजय गोरे यांनी खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास बापू भुमरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुलाचे काम सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करत ही केवळ विकासकामाची सुरुवात नसून गावाच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याची प्रतिक्रिया दिली.या पुलामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार असून, भविष्यात गावाच्या विकासाला गती मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
यावेळी संत एकनाथ कारखान्याचे माजी संचालक विजय गोरे, उपसरपंच चंद्रहार लाटे, ग्रामपंचायत सदस्य आसाराम ठोंबरे, गणेश बोंबले, काकासाहेब लाटे, रामनाथ सोनवणे, शंकर मोहिते, नितीन जाधव, अमोल सोलाटे, दिनेश सोलाटे, अशोक जामदार, अक्षय गोरे, मुस्ताक सय्यद, संतोष गिरी, योगेश अवधूत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



