बीड

गेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल 

गेवराई-भिवंडी बससेवा अचानक बंद; प्रवाशांचे प्रचंड हाल
आगारप्रमुखांच्या गलथान व मनमानी कारभारावर नागरिकांचा संताप
गेवराई : प्रतिनिधी
    गेवराई आगारातून अनेक वर्षांपासून नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बससेवा मागील काही दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेष म्हणजे ही बससेवा बंद करण्यामागे आगारप्रमुखांचा मनमानी व गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप प्रवासी, नागरिकांकडून करण्यात येत आहे.
     गेवराई आगारातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणारी ही बस पाडळशिंगी, मादळमोही, कोळगाव, तिंतरवणी, पाथर्डी, अहिल्यानगर (अहमदनगर) मार्गे भिवंडीपर्यंत जात होती. या मार्गावरील शेकडो प्रवाशांसाठी ही बस अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. विशेषतः अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचारासाठी जाणारे रुग्ण, कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसेच विद्यार्थी यांच्यासाठी ही बससेवा मोठा आधार होती. मात्र मागील काही महिन्यांपासून ही बस अधूनमधूनच सोडली जात असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर मागील चार-पाच दिवसांपासून ही बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याबाबत आगार प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
   मुळात या मार्गावर आधीच बससेवा कमी असताना वर्षानुवर्षे नियमित सुरु असलेली गेवराई-भिवंडी बस अचानक बंद करण्यामागे आगारप्रमुखांना नेमके साध्य काय करायचे आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ही बससेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत असताना आगारप्रमुख मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. या मनमानी कारभारामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे आगारप्रमुखांच्या गलथान व निष्क्रिय कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून तात्काळ ही बससेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.
Back to top button