श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे आ. सुरेश धस यांनी घेतले बडे बाबांच्या समाधीचे दर्शन; विकासकामांची केली पाहणी

श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे आ. सुरेश धस यांनी घेतले बडे बाबांच्या समाधीचे दर्शन; विकासकामांची केली पाहणी
आष्टी,(प्रतिनिधी) : सोमवती अमावस्येच्या पावन पर्वाचे औचित्य साधत आमदार सुरेश धस यांनी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे भेट देऊन बडे बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांनी समाधीस्थळी नतमस्तक होत राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
सोमवती अमावस्या हा धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर आ. सुरेश धस यांनी गडावरील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कामांचा त्यांनी आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.
गड परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी निवास, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अंतर्गत रस्ते तसेच परिसर सुशोभीकरण यांसारख्या विविध कामांच्या प्रगतीची माहिती त्यांनी घेतली. श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे येणाऱ्या भक्तांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विकासकामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
यावेळी उपस्थित भाविकांशीही त्यांनी संवाद साधत त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. धार्मिक स्थळांचा विकास हा केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित नसून श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे कार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आ. सुरेश धस म्हणाले, “श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचे हे पवित्र स्थान अनेक भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला समाधानकारक सुविधा मिळाव्यात, तसेच या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. बडे बाबांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना.”



