बीड
अंबाजोगाई ‘पुस्तकांचे गाव’ होण्यासाठीचा शासननिर्णय प्रशासकीय दिरंगाईत रखडला

अंबाजोगाई ‘पुस्तकांचे गाव’ होण्यासाठीचा शासननिर्णय प्रशासकीय दिरंगाईत रखडला
तातडीने कार्यवाही करण्याचे आ. नमिता मुंदडा यांचे निर्देश
अंबाजोगाई प्रतिनिधी, बालाजी देशमुख: बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबाजोगाई शहराला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळावी, यासाठी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी प्रशासकीय स्तरावर आक्रमक पाऊले उचलली आहेत. मराठी भाषेचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या या शहराचा शासन निर्णय (जीआर) अद्याप प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडला असून, आमदार मुंदडा यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये अंबाजोगाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध भाषातज्ज्ञांच्या मते येथेच मराठी भाषेचा उगम झाला असून हे स्थान मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठीतील आद्यकवी मुकुंदराज यांनी आपल्या अजरामर “विवेक सिंधु” ग्रंथाची रचना याच भूमीत केली आहे. या ऐतिहासिक आणि वाङ्मयीन पार्श्वभूमीचा विचार करूनच महाराष्ट्र राज्याच्या उद्योग व मराठी भाषा मंत्र्यांनी अंबाजोगाईला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून विकसित करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.
मात्र, या घोषणेनंतरही संबंधित विभागाचा अधिकृत शासन निर्णय निर्गमित होणे अद्याप प्रतीक्षाधीन आहे. राज्य मराठी विकास संस्थेने या संदर्भात अंबाजोगाई शहराची सर्वंकष माहिती, निकष आणि अटींनुसार एका नमुन्यात मागवली होती. यामध्ये गावाची लोकसंख्या, सोयीसुविधा, ऐतिहासिक स्मारके, प्रेक्षणीय स्थळे आणि प्रकल्पासाठी उपलब्ध होऊ शकणारी जागा अशा विविध मुद्द्यांचा समावेश आहे. ही माहिती वेळेत सादर न झाल्यामुळे शासन निर्णय प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला असल्याचे समोर आले आहे.
आमदार नमिता मुंदडा यांनी यापूर्वी २५ ऑगस्ट २०२५ रोजी देखील या विषयाचा पाठपुरावा केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी प्रशासनाला स्मरणपत्र देत स्पष्ट केले आहे की, राज्य मराठी विकास संस्थेने मागवलेली माहिती त्वरित पाठवण्यात यावी, जेणेकरून ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘कवितांचे गाव’ या योजनांचा शासन निर्णय मार्गी लागेल. या प्रकल्पामुळे अंबाजोगाईच्या साहित्यिक वैभवात भर पडणार असून पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.



