बीड

बीड तालुक्यात भाजपकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू

बीड तालुक्यात भाजपकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू

ना.पंकजाताई मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक
बीड (प्रतिनिधी)दि.२७ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. शहरातील के.एस.के. महाविद्यालयाच्या सभागृहात रविवार, दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस इच्छुक उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे बीड ग्रामीण मंडळ प्रमुख मनोज पाटील, राणा डोईफोडे व अशोक रसाळ यांनी केले आहे.
बीडमध्ये होणाऱ्या या बैठकीच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची रणनिती ठरविणे, संघटन अधिक बळकट करणे तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून, स्वतः इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, भाजपा नेते बाळराजे पवार, भाजप राज्य परिषद सदस्य अक्षय मुंदडा, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडेल. बीड तालुक्यासाठी जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, माधव निर्मळ, सतीश मुंडे व संजय आंधळे हे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या सर्व नियोजन बैठका शंकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला भरीव यश मिळवून देण्याच्या दृष्टीने या बैठका अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांनी बीड तालुक्यासाठी नियुक्त प्रभारींकडे आपले अर्ज व नाव नोंदणी करावी, असे आवाहन भाजपचे बीड ग्रामीण मंडळ प्रमुख मनोज पाटील, राणा डोईफोडे व अशोक रसाळ यांनी केले आहे.
चौकट
डॉ.योगेश क्षीरसागर ताकद लावणार
बीड नगरपरिषद निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली १५ नगरसेवक विजयी झाले. त्यांच्या या यशाबद्दल पक्षश्रेष्ठींकडून कौतुक होत आहे. आता डॉ.क्षीरसागर हे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीही ते ताकद लावणार आहेत.
Back to top button