बीड
एकमेकांशी प्रेमाने वागणे हीच खरी आध्यात्मिकता – ह.भ.प. शिवाजी महाराज

एकमेकांशी प्रेमाने वागणे हीच खरी आध्यात्मिकता – ह.भ.प. शिवाजी महाराज
शनि जन्मोत्सवानिमित्त सहाव्या दिवशी कीर्तनसेवा संपन्न
बीड येथील श्री शनी मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शनि जन्मोत्सव निमित्त चालू असलेल्या कीर्तन महोत्सवात सहाव्या दिवशी ह.भ.प. शिवाजी महाराज मते यांच्या सुस्वर व अर्थपूर्ण कीर्तनसेवेने भाविक श्रोते मंत्रमुग्ध झाले. भक्तिरसाने ओथंबलेल्या या कीर्तनातून त्यांनी “एकमेकांशी प्रेमाने वागणे हीच खरी आध्यात्मिकता आहे,” हा मोलाचा संदेश दिला. कीर्तनासाठी त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा “सदा नाम घोष करू हरिकथा । तेणे सदा चित्ता समाधान ॥” हा अभंग निवडला होता. या अभंगाचे निरूपण त्यांनी बीडच्या अस्सल ग्रामीण सांगलीत, तसेच शुद्ध वारकरी सांप्रदायिक पद्धतीने केले. त्यांच्या निरूपणात संतपरंपरेचा गोडवा, ग्रामीण बोलीतील आपुलकी आणि अध्यात्मिक विचारांची खोली यांचा सुंदर संगम दिसून आला. ह.भ.प. शिवाजी महाराज यांनी निरूपणात सांगितले की, अध्यात्मिकता ही केवळ बाह्य प्रदर्शनापुरती मर्यादित नसून ती आपल्या दैनंदिन वागण्यातून प्रकट झाली पाहिजे. नामस्मरण, हरिकथा, भक्ती हे जीवन शुद्ध करण्याची साधने असून, खऱ्या अर्थाने अध्यात्म स्वीकारायचे असेल तर माणसामाणसांत प्रेम, समजूतदारपणा आणि करुणा असणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी ठासून सांगितले. संतांनी सांगितलेला भक्तीमार्ग हा समाजाला जोडणारा, माणुसकी जागवणारा असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
या कीर्तनसेवेसाठी मृदुंगाचार्य तेजस महाराज मते यांनी तालाची साथ दिली, तर गायनाचार्य वैभव महाराज काकडे यांनी सुमधुर गायनातून अभंगाला अधिक उंची प्राप्त करून दिली. बाबा महाराज मुळे, बालू महाराज मते, रमेश महाराज जाधव, महेश महाराज लोणकर, श्रीकृष्ण महाराज उबाळे यांचीही या कीर्तनात उपस्थिती होती. तसेच श्री शनी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष रामनाथ भाऊ खोड, बंकटस्वामी संस्थानचे टाळकरी आणि मोठ्या संख्येने वारकरी-भाविक उपस्थित होते. भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात अभंगाचा आनंद घेतला. संपूर्ण परिसर भक्तीरसाने भारावून गेला होता. शनी जन्मोत्सवानिमित्त सुरू असलेला हा कीर्तन महोत्सव समाजाला अध्यात्मिक विचारांची दिशा देणारा ठरत असून, अशा कीर्तनातून संतपरंपरेचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.



