बीड
किती विनाअनुदानित शिक्षकांचा बळी घेतल्यावर सरकार वाढीव टप्प्यासाठी आर्थिक तरतूद करणार

किती विनाअनुदानित शिक्षकांचा बळी घेतल्यावर सरकार वाढीव टप्प्यासाठी आर्थिक तरतूद करणार
विनाअनुदानित शिक्षकांचा संतप्त सवाल
वाढीव टप्पा अनुदानासाठी भरीव आर्थिक तरतूद करा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
बीड दि.१५(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील एका विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी वेतनासाठी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले ही महाराष्ट्रासाठी अत्यंत खेदाची आणि चिंताजनक बाब आहे. या सरकारला अजून किती विना अनुदानित शिक्षकांचा बळी घेतल्यानंतर विना अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना वाढीव टप्प्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करणार? शिवाय शंभर टक्के अनुदान कधी देणार? असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे छत्रपती संभाजीनगर विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, उपाध्यक्ष भागवत यादव यांनी केला आहे.
बीड जिल्हासह महाराष्ट्रामध्ये हजारो विनाअनुदान तत्त्वावर सुरू असलेल्या शाळेमध्ये लाखोंच्या संख्येने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी काम करत आहे. या सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आपल्या हक्काच्या वेतनासाठी वारंवार आंदोलन केली. तेव्हा सरकारने अनुदान जाहीर केले. परंतु अनुदान जाहीर केल्यापासून अजतागायत 100% अनुदान देण्यापासून वंचित ठेवले आहे. सध्या जे शिक्षक 20% 40% 60% टक्के अनुदानावर काम करत आहेत. त्या शिक्षकांना पुढील वाढीव टप्पा अनुदान मिळावे यासाठी या सर्व शिक्षकांनी मागच्या वर्षी तब्बल पाच ते सहा महिने सातत्याने आंदोलन केले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आचारसंहिता लागण्यापूर्वी या सर्व शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान घोषित केले. तसेच या संदर्भात 10 ऑक्टोबर 2024 रोजी शासन आदेश काढला. परंतु अद्यापही वाढीव टप्पा अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे अनुदानाचा टप्पा वाढला असला तरी अद्याप शिक्षकांच्या वेतनात वाढ झाली नाही. त्यामुळे वाढीव टप्पा अनुदानापासून हे सर्व शिक्षक वंचित राहिले आहेत. सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वाढीव टप्पा अनुदानासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद होईल असे वाटत होते. परंतु निधीची तरतूद न झाल्यामुळे या शिक्षकांच्या पदरी निराशा आली. एकीकडे अनुदान नाही दुसरीकडे
कुटुंबांचा खर्च भागविणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे हे सर्व शिक्षक चिंताग्रस्त झाले आहे.
निराशाच्या गर्गेत जीवन जगत आहेत. या निराशेतूनच काल बीड जिल्ह्यातील एका विनाअनुदान शाळेत काम करणाऱ्या धनंजय नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलले. सरकारने जर जाहीर केलेल्या वाढीव टप्पा अनुदानासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद केली असती तर धनंजय नागरगोजे यांचा जीव वाचला असता. एकंदरीत
या सरकारला विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
विविध टप्प्यावर काम करत असणाऱ्या शिक्षकांना शंभर टक्के अनुदान कधी देणार? अजून किती विना अनुदानित शिक्षकांचा बळी गेल्यावर सरकार विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या पगारासाठी लागणारी आर्थिक तरतूद करणार ? तसेच या सरकारला अजून किती शिक्षकांचा बळी घ्यायचा ? असा संतप्त सवाल
मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष वैजनाथ चाटे, छत्रपती संभाजी नगर विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, छत्रपती संभाजी नगर विभागाचे निरीक्षक विजयसिंह शिंदे महिला संघटनेच्या महिला आघाडीच्या मराठवाडा संघटक मुक्ता मोटे, दैवशाला मुंडे, सुरेखा गायकवाड मॅडम, मस्के मॅडम, बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, जिल्ह्याचे पदाधिकारी सौंदलकर, शेख, जिल्हा उपाध्यक्ष रामदास जामकर, पंकज कळसकर, बीड तालुकाध्यक्ष भागवत यादव, वडवणी तालुका अध्यक्ष वैजिनाथ शिंदे, गेवराई तालुका अध्यक्ष दीपक गरूड, आष्टी तालुका अध्यक्ष रविंद्र भुकन, पठाण, मोरे , गवळी, बाळासाहेब नागरगोजे, प्रताप देशमुख, श्रीराम जाधव, गोविंद आघाव, भालके, सुरेश कदम, जावेद पठाण, मुंडे यांच्यासह आदींनी उपस्थित केला आहे. दरम्यान तातडीने वाढीव टप्पा अनुदानासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.


