बीड

बीडमध्ये ‘हमारा शौचालय – हमारा भविष्य’ मोहीम कागदावरच? शाळेसाठी ग्रामस्थांनी ६ गुंठे जमीन, लोकवर्गणीतून रंगरंगोटी–लाईटफिटींग; तरीही स्वच्छतागृहाचे काय? बेलगाव वस्तीवरील पालकांची मागणी — पालकमंत्री अजितदादा, मंत्री आदिती तटकरे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन :– डॉ. गणेश ढवळे

बीडमध्ये ‘हमारा शौचालय – हमारा भविष्य’ मोहीम कागदावरच?
शाळेसाठी ग्रामस्थांनी ६ गुंठे जमीन, लोकवर्गणीतून रंगरंगोटी–लाईटफिटींग; तरीही स्वच्छतागृहाचे काय?
बेलगाव वस्तीवरील पालकांची मागणी —
पालकमंत्री अजितदादा, मंत्री आदिती तटकरे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन :– डॉ. गणेश ढवळे
बीड :– (दि.०४) केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त १९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व १३५६ गावांतील वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, रंगरंगोटी करून ती वापरात आणण्याचे निर्देश विभागाकडून देण्यात आले आहेत. आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि उमेद विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केले आहे.
मात्र, ही मोहीम प्रत्यक्षात कागदोपत्रीच राबविली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळा व अंगणवाड्यांमध्ये आजही शौचालयांचा अभाव असून, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर नोंद त्यांनी निवेदनात केली आहे.
डॉ. ढवळे म्हणाले की, “शौचालय ही केवळ सुविधा नसून आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेशी निगडित मूलभूत गरज आहे. अनेक निवेदने व आंदोलने करूनही प्रशासन जागे नाही.”
त्यांनी ग्रामीण भागातील सर्व शाळा-अंगणवाड्यांमध्ये तातडीने शौचालयांची निर्मिती, अपूर्ण शौचालयांची दुरुस्ती आणि वापरासाठी सुसज्जता करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील लेखी निवेदन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री अजितदादा पवार आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेमार्फत पाठविण्यात आले आहे.
**मुख्य कार्यकारी अधिकारींची मोहीम कागदावरच?
केंद्र प्रमुखांना साधे पत्रही नाही — डॉ. ढवळे**
जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार १० डिसेंबर रोजी ‘उत्कृष्ट शौचालय पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. मात्र, प्रत्यक्षात या मोहिमेची कोणतीही माहिती संबंधित शाळांना देण्यात आलेलीच नाही, असे चित्र दिसून येत आहे.
लिंबागणेश केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दिपक घाटे यांनी सांगितले की, “मोहीमेसंदर्भात आम्हाला कोणतेही पत्र, आदेश किंवा सूचना मिळाल्या नाहीत.”
यावर प्रतिक्रिया देताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले, “म्हणूनच स्पष्ट होते की मोहीम फक्त कागदावर आहे, जमिनीवर काहीच नाही.”
बेलगाव वस्ती शाळेसाठी ग्रामस्थांचा त्याग —
६ गुंठे जमीन, ५० हजारांची लोकवर्गणी; तरीही स्वच्छतागृह नाही
लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषद अंतर्गत बेलगाव वस्ती शाळेची रंगरंगोटी व लाईटफिटींग ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून केली आहे. या कामांसाठी जवळपास ५० हजार रुपये जमा करून खर्च करण्यात आला. शाळेसाठी ६ गुंठे जमीन स्वतःहून देण्यात आली.
मात्र, शौचालयाची किमान सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यास शासन अपयशी ठरत असल्याने पालकांत संताप व्याप्त आहे.
पालक सुखदेव कोळपे म्हणाले,
“आम्ही स्वतः पैसे जमवून शाळेला रंगरंगोटी केली, लाईटफिटींग केली. जमीनही दिली. निदान आमच्या लेकरांसाठी शासनाने एक तरी स्वच्छतागृह उभारावे.”
— डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो. ८१८०९२७५७२
Back to top button