अमरावतीच्या वाहतुकीला नवे पंख! आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची प्रकल्पांना वेग देण्याची कडक सूचना

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती :
अमरावती शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देत पायाभूत सुविधांच्या उभारणीस नवचैतन्य मिळवून देण्यासाठी महापालिकेत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. शहरातील वाहतुकीचे आव्हान कमी करण्यासाठी सुरु असलेल्या सहा प्रमुख प्रकल्पांच्या कामांची सखोल पाहणी यावेळी करण्यात आली.
राजापेठ व गोपाल नगर अंडरपास, राजकमल चौक उड्डाणपूल तसेच एफ.ओ.बी. यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर विभागीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आयुक्तांनी कामाच्या गती, दर्जा व नियोजनाबाबत स्पष्ट निर्देश दिले. प्रकल्प वेळेत, दर्जेदार व नागरिकांना प्रत्यक्ष लाभदायी ठरतील, यासाठी कोणतीही तडजोड होऊ नये, असेही त्यांनी बजावले.
आगामी काळात या प्रकल्पांची वेळेत पूर्तता झाली तर शहराची वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होणार असून नागरिकांना सुरक्षित, वेगवान व सुसज्ज वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. महापालिकेचा हा पुढाकार अमरावतीला आधुनिक पायाभूत सुविधांकडे झपाट्याने नेणारा ठरणार आहे.



