बीड

टक्केवारी खाऊन राजकारण करणाऱ्यांच्या तोंडी शहराच्या विकासाची भाषा शोभत नाही – बाळराजे पवार

टक्केवारी खाऊन राजकारण करणाऱ्यांच्या तोंडी शहराच्या विकासाची भाषा शोभत नाही – बाळराजे पवार
———
भाजपच्या मेनरोड परिसरातील कॉर्नर सभेला तुफान गर्दी
———————-
गेवराई (प्रतिनिधी) : विकासाची भाषा करून,जनतेची दिशाभूल करणारे अमरसिंह पंडित यांनी गेवराई तालुक्यातील विकासाचे एक गाव दाखवावे, तुम्ही केलेली एक चांगली पाणी पुरवठा योजना सुरू असलेली दाखवा, पोपटपंची करून विकासाच्या गप्पा मारता आणि टक्केवारी खाता तुमच्या तोंडात विकासाची भाषा शोभत नाही अशी खरमरीत टिका भाजप नेते बाळराजे पवार यांनी येथे बोलताना केले.
गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. 25 रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कॉर्नर सभेत भाजप युवा नेते बाळराजे दादा पवार यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर आक्रमक आणि कडक शब्दात हल्ला चढवला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गिताभाभी पवार तसेच प्रभाग क्रमांक 8, 9 व 10 मधील उमेदवार सोनाली सुभाष सुतार, शहेदाद भाई आणि एजाज भाई सय्यद यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री बदामरावजी पंडित, उमेदवार सौ.गीताभाभी पवार, रोहीत पंडित, प्रा.पी टी चव्हाण, अमोल करांडे, राजेंद्र राक्षसभुवनकर, सय्यद एजाज, शेख शेहदाद, कैलास माने, बबलू खराडे, महिला आघाडीच्या सौ.रत्नमाला मोटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या सभेत बोलताना बाळराजे पवार यांनी अमरसिंह पंडित यांच्यावर विकासाच्या नावाखाली जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करत कठोर शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, विकासाची भाषा करणारे बीडचे अमरसिंह पंडित गेवराई तालुक्यातील विकासाचे एक गाव दाखवू शकत नाहीत. एकही पाणी पुरवठा योजना योग्यरित्या सुरू नसताना विकासाची गप्पा मारणे म्हणजे जनतेची थेट फसवणूक आहे.
ते पुढे म्हणाले, पोपटपंची करू नका. विकासाची भाषा करता आणि मागच्या बाजूने टक्केवारी खाता. गेवराईच्या जनतेला दाखवायला तुमच्याकडे एकही भरीव काम नाही. तुम्ही गेवराईचे हित साधणारे नाही, तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात.
अमरसिंह पंडित यांच्यावर हल्ला चढवत बाळराजे पवार म्हणाले की, गेवराईत त्यांच्या नावाने विकासाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो; पण प्रत्यक्षात सुरू असलेले काम काहीच नाही. गावोगावी जनतेसमोर विकासाच्या गोष्टी सांगतात, पण दाखवायला एकाही प्रकल्पाची प्रगतीपथावरील स्थिती नाही. गेवराईला मागे टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ढोंग्यांना जनता ओळखते, असे ते म्हणाले.
बाळराजे पवार यांनी पंडित यांच्यावर खोटे आश्वासन, फसवी जाहिरातबाजी आणि जनतेच्या भावनांचा गैरवापर केल्याचे आरोप करत त्यांना थेट आव्हान दिले. गेवराईत उभा राहून दाखवा एक गाव जिथे विकास तुमच्या काळात झाला, एक योजना जिथे पाण्याचा प्रश्न सुटला. काहीच नाही. केवळ भाषणबाजी करून आपण नेता होत नाही. नेता तोच जो काम दाखवतो, असे ते म्हणाले.
सभा शेवटी बाळराजे पवार म्हणाले, हा नगरपरिषद निवडणुकीचा लढा दिशाभूल करणाऱ्या व ढोंगी राजकारण करणाऱ्यांविरुद्ध आहे. गेवराईच्या विकासासाठी प्रामाणिकपणा लागतो, स्वच्छता लागते. ती आमच्या उमेदवारांमध्ये आहे. ही नगरपरिषद भ्रष्टांचाऱ्यांच्या हातात द्यायची की प्रामाणिक लोकांच्या हे आता जनतेने ठरवायचे आहे. बाळराजे पवार यांच्या या आक्रमक टीकेमुळे सभेचे वातावरण चांगलेच तापले. तर या सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहरातील वातावरण भाजपमय झाल्याचे दिसून येत आहे.
Back to top button