बीड
जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल चार नगर परिषदांच्या पत्रकार परिषदांत प्रशासनाची तयारी स्पष्ट

जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल चार नगर परिषदांच्या पत्रकार परिषदांत प्रशासनाची तयारी स्पष्ट
भंडारा, :- जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका चार वर्षांनंतर होत असून, येत्या २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, तहसीलदार व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांत निवडणुकीची सर्वांगीण तयारी, मतदारसंख्या, प्रभाग रचना आणि आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. उमेदवार, पक्ष प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, प्रशासनाने शांत, पारदर्शक आणि सुरळीत निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज केल्याचे स्पष्ट केले.
भंडारा : १७ प्रभाग, ३५ नगरसेवक — सर्वात मोठ्या नगर परिषदेची धावपळ
भंडारा नगर परिषदेत १७ प्रभागातून ३५ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी थेट मतदान होणार आहे. हे पद महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ९१,४८५ इतकी असून ८५,६०८ मतदार (पुरुष ४९,३४४, महिला ४४,२६१) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तृतीयपंथी मतदार ३ आहेत. एकूण २११ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली असून २३२ कंट्रोल युनिट आणि ४६४ बॅलेट युनिट वापरली जाणार आहेत.
पवनी : आचारसंहिता लागू, २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवड
पवनी नगर परिषद क्षेत्रात १ नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदांसाठी निवडणूक होणार आहे. तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी किरण वागसकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार २४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंख्या २२,२७७ असून त्यात पुरुष १०,७०५ आणि महिला ११,५६५ मतदारांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्र ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
साकोली ,सेंदूरवाफा : १० प्रभागांतून २० सदस्य, २ डिसेंबरला मतदान
साकोली-सेंदूरवाफा नगर परिषद निवडणुकीबाबत तहसीलदार नीलेश कदम यांनी माहिती दिली. येथे १० प्रभागांतून २० सदस्यांबरोबरच नगराध्यक्षांचीही थेट निवड होणार आहे.
मतदारसंख्या २२,६८१ (पुरुष ११,०४० व महिला ११,६४९) असून ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू आहे.
नामनिर्देशनपत्र दाखल १० ते १७ नोव्हेंबर, छाननी १८ नोव्हेंबर, तर माघारी २१ किंवा २५ नोव्हेंबरपर्यंत घेता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कदम यांनी सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले.
तुमसर : १२ प्रभाग, २५ नगरसेवक; नगराध्यक्ष थेट जनतेतून
तुमसर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा उपजिल्हाधिकारी जनार्धन लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केली. येथे १२ प्रभागांतून २५ नगरसेवक आणि नगराध्यक्षांची थेट निवड होणार आहे.
शहरातील मतदारसंख्या ३९,७५६ असून त्यात पुरुष १९,२०८ आणि महिला २०,५४८ मतदार आहेत. मतदानासाठी ५० मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून पोलिस बंदोबस्त तैनात राहणार आहे.
दिव्यांग आणि अशक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी यंदा घरपोच मतदान सुविधा उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
प्रशासन सज्ज — पारदर्शक निवडणुकीचा निर्धार
तिन्ही स्तरांतील निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदांमधून शांततापूर्ण, प्रामाणिक आणि सुशोभित निवडणुकीचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, लोकशाही मजबूत करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
जिल्ह्यात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला असून उमेदवारांच्या प्रचारयुद्धाला वेग येत आहे.


