संपादकीय
अंगात १०२ ताप असतानाही आराध्याची राज्यस्तरीय झेप! माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या जलतरणपटूची विलक्षण कामगिरी

प्रतिनिधी | बीड :
अंगात १०२ अंश ताप असतानाही न थांबता, अदम्य जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल, तळेगाव येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आराध्या अमोल शिंदे हिने जलतरण स्पर्धेत झळाळते यश मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
नुकत्याच झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत आराध्याने २०० मीटर बॅक स्ट्रोक मध्ये रौप्यपदक (सिल्वर मेडल), १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये रौप्यपदक, तर १०० मीटर बॅक स्ट्रोक मध्ये कांस्यपदक (ब्राँझ मेडल) पटकावत बीड जिल्ह्याची मान उंचावली आहे. या कामगिरीच्या जोरावर ती महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडली गेली आहे. आराध्याच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे सातत्यपूर्ण प्रयत्न, तसेच शाळेचे स्पोर्ट्स टीचर अशोक सर, मंजुळे सर, शैलेश चव्हाण सर व रोहन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलचे संचालक ज्ञानेश्वर तांबे व, नम्रता भानुसे प्राचार्या सारिका जगताप यांनी आराध्याचे अभिनंदन करत तिच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यापूर्वीही आराध्याने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत २०० मीटर बॅक स्ट्रोक, १०० मीटर बॅक स्ट्रोक आणि १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक या तीनही प्रकारांत सुवर्णपदक जिंकून आपली दमदार कामगिरी सिद्ध केली होती.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ही आराध्या सुवर्ण कामगिरी करेल
जिल्हा आणि विभाग स्तरावर आराध्या शिंदे या आमच्या विद्यार्थीनिने अत्यंत उत्कृष्ठ कामगिरी करत शाळेचे आणि जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठीही ती सुवर्ण कामगिरी करेल.
-ज्ञानेश्वर तांबे , संचालक



