माऊली ज्ञानोबारायांच्या सातशे पन्नासाव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एकावन्न ज्ञानेश्वरी ग्रंथ मोफत भेट देण्याचा माधव महाराज डाके यांचा उपक्रम

माधव महाराज डाके यांचा उपक्रम
बीड जिल्ह्यातील ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक तथा ज्ञानेश्वरी भावकथा प्रवक्ते श्री. ह भ प माधव महाराज डाके काठवडेकर यांनी माऊली ज्ञानोबारायांच्या सातशे पन्नासाव्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 51 ज्ञानेश्वरी ग्रंथ मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
सविस्तर वृत्त असे की,बीड शहरातील वारकरी सांप्रदायिक कीर्तनकार श्री.ह.भ.प. माधव महाराज डाके यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊली ज्ञानोबरायांच्या चालू असणाऱ्या सातशे पन्नासाव्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त पन्नास ज्ञानेश्वरी ग्रंथ मोफत वाटपाचा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला असून, आजवर ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरी पोहोचलेली नाही, ज्ञानेश्वरी वाचनाचे स्वर घुमले नाही, ज्यांना आयुष्यात ज्ञानेश्वरीची वाचन आणि श्रवण साधना घडली नाही. अशा घरात ज्ञानेश्वरीचा प्रचार , प्रसार व्हावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे पत्रकात डाके महाराजांनी म्हटले आहे.
ज्या लोकांना ज्ञानेश्वरी जाणून वा समजून घेण्याचे कुतूहल आहे. अशा भाविक लोकांच्या घरात ज्ञानेश्वरी पोहोचती करून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून माऊली ज्ञानोबारायांचे विचार घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प हरिभक्त परायण माधव महाराज डाके यांनी केला असून, पन्नास श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्याचा उपक्रम त्यांनी या माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त हाती घेतला आहे.
लवकरच अशा गरजू तथा इच्छुक भाविक भक्तांच्या घरी स्वतः जाऊन ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय वाचून, भाविकांच्या हातात ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देण्याचा संकल्प ह.भ.प. माधव महाराज डाके यांनी केला आहे.
या उपक्रमात सहभागी होऊन याचा लाभ गरजू तथा भाविक ज्ञानेश्वरी वाचकांनी घ्यावा असे आवाहन माधव महाराज डाके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.



