बीड
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात प्रशासनाकडून परळी पोलिसात फिर्याद

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात प्रशासनाकडून परळी पोलिसात फिर्याद
निवडणूक प्रक्रियेत परळीत ड्युटी नसताना खोटे आरोप करत खळबळ माजवल्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल
परळी (प्रतिनिधी) – परळी विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेत किंवा मतमोजणी तसेच ईव्हीएम च्या सुरक्षेच्या संदर्भात कोणतीही ड्युटी नसताना, केवळ खळबळ माजवण्याच्या उद्देशाने खोटे, चुकीचे आरोप करणाऱ्या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याच्या विरोधात परळीचे तहसीलदार (निवडणूक) यांनी परळी पोलिसात फिर्याद दिली असून, कासले विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला निवडणूक, ईव्हीएम मशीन सुरक्षा किंवा मतमोजणी दरम्यान कुठेच परळी विधानसभा मतदारसंघात ड्युटी दिलेली नव्हती. ईव्हीएम मशीन ची सुरक्षा केंद्रीय राखीव पोलीस बल व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान यांच्या देखरेखीत व पूर्णवेळ सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये झाली होती. त्यास निवडणूक निरीक्षक तसेच सर्वपक्षीय उमेदवार प्रतिनिधी साक्षीदार आहेत.
मात्र तरीही कासले याने समाज माध्यमांवर व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ईव्हीएम ड्युटी होती, तिथे ड्युटीवर गप्प राहायचे यासाठी मला दहा लाख रुपये देण्यात आले, असे चुकीचे आरोप करत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी, राज्य सरकार यावर शंका निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण व्हावा त्याचबरोबर निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह व बदनामी तसेच सह देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शंका उपस्थित करणारे वक्तव्य स्वतः लोकसेवक असताना कासले याने केले असून, त्या विरुद्ध नायब तहसीलदार निवडणूक श्री अण्णा वंजारे यांच्या फिर्यादीनुसार परळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १७५, ३३६ (४), ३५३ (१- ब), १९८, ३५६ (२), तसेच १९७ (१- ड) या अंतर्गत गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास परळी शहर पोलिस करत आहेत.
दरम्यान रणजित कासले याने अटक होण्यापूर्वी निवडणूक आयोगाला आव्हान देणारे काही बेजबाबदार वक्तव्ये केली होती, त्यावरून आयोगाने बीड जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल मागवला असल्याचे समजते.
बीड जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगास रणजित कासले याने केलेल्या वक्तव्याबाबत गुप्त अहवाल सादर केला असून, रणजित कासले याला निवडणुकीत काळात बीड सायबर विभागात नेमणूक दिलेली होती, त्याची ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात नव्हती त्यामुळे त्याचा निवडणूक प्रक्रियेत काहीही संबंध नव्हता, असा अहवाल सादर केला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले आहे.
तर दुसरीकडे रणजित कासले ज्या दहा लाख रुपयांची गोष्ट सांगत हे सगळे आरोप करत होता, ते दहा लाख रुपये अंबाजोगाई येथील संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन चे संचालक सुदर्शन काळे यांच्या कडून कासले याने मागून घेतले होते तसेच त्यातून साडे सात लाख रुपये आतापर्यंत काळे यांना परत दिले असून आणखी उरलेले अडीच लाख रुपये परत द्यावेत यासाठी सुदर्शन काळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे स्वतःच नशेत वक्तव्ये करतो असे विधान करणाऱ्या रणजित कासले याने केलेली वक्तव्ये निराधार खोटी आणि केवळ सनसनाटी निर्माण करायच्या उद्देशाने केलेले होते हे आता स्पष्ट झाले आहे.


