बीड
लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त संगीतमय भागवत कथा सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न
लिंबागणेश : (दि. ५) बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह (दशम स्कंध) धार्मिक व भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. दि. २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या सप्ताहाची सांगता दि.५ सप्टेंबर रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली.
सप्ताहभर सकाळी पारायण, दुपारी उटी-उपहार, सायंकाळी आरती व प्रवचन तसेच रात्री श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. प.पू. महंत श्री ओंकार व्यास बाबा शास्त्री महानुभव (श्रीक्षेत्र पांचाळेश्वर, ता. गेवराई, जि. बीड) यांच्या रसाळ प्रवचनातून भाविकांना आध्यात्मिक व भक्तिमय अनुभूती मिळाली.
शुक्रवारी मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीकृष्ण जन्माचा सोहळा झाल्यानंतर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत जल्लोष केला.
समारोपप्रसंगी पोहीचा देव संस्थानचे महंत रंगनाथभाऊ वायंदेस्कर, महंत विश्वनाथ बाबा यांच्यासह पंचक्रोशीतील महानुभाव पंथीय भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भजनी मंडळीतील मृदंगवादक गणेश महाराज, संदीप आमटे, पांडुरंग वाणी, बाजीराव दशमे, बारीक ढास, सतीश शिंदे , गणपत घोलप, मोहन कोटुळे आदींनी सादर केलेल्या सुरेल भजनांनी वातावरण भक्तिमय करून टाकले.
या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे पुजारी विजय पाटोदेकर, ह भ.प. अनंतकाका मुळे,सरपंच बालासाहेब जाधव,राजेभाऊ आप्पा गिरे, कल्याण वाणी, रविंद्र निर्मळ,बाळकृष्ण थोरात , गणपत तागड , भगवान मोरे ,तुळशीराम वनवे, बाळकृष्ण मुळे, सुरेश ढवळे, शंकर वाणी,गोवर्धन गिरे, रामकिसन गिरे, अर्जुन गिरे, सुदाम रणखांब, विनायक वाणी, विक्रांत वाणी, संतोष भोसले, विठ्ठल कदम, रणजित भोसले, विनायक वाणी, संजय पावले, दशरथ दाभाडे , जयदेव गिरे, रामदास मुळे, दादा गायकवाड, अर्जुन घोलप, सुंदर नाना जाधव, बिभिषण वाणी, रामदास वाणी, बसवंता खाडीलकर आदी मान्यवर व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
काल्याच्या कीर्तनानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाने भारलेल्या वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव व भागवत कथा सप्ताहाची सांगता झाली.
डॉ.गणेश ढवळे, लिंबागणेशकर
८१८०९२७५७२



