स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात ध्वजारोहण

स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये उत्साहात ध्वजारोहण
युवा पिढीने शिक्षणासोबत संस्कार आणि संविधानिक मूल्ये आत्मसात करावीत — राजेंद्र मस्के
बीड प्रतिनिधी-आजची युवा पिढी ही देशाची खरी ताकद आहे. सुदृढ लोकशाही आणि समृद्ध भारताची जबाबदारी उद्याच्या युवकांनी समर्थपणे सांभाळावी. विद्यार्थ्यांनी केवळ चांगले विद्यार्थी नव्हे, तर चांगले माणूस आणि जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करावा. स्वतःच्या प्रगतीसोबत समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा, विवेक तसेच संविधानिक मूल्ये आत्मसात केली, तरच सुदृढ लोकशाही, सक्षम आणि समृद्ध भारताची निर्मिती होईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्रजी मस्के यांनी केले.
दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमेश्वर पब्लिक स्कूल, चराटा रोड, बीड येथे अत्यंत उत्साही वातावरणात राजेंद्र मस्के यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक व्यंकटराव सानप, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. भागवत आगाम सर, मजूर फेडरेशनचे संचालक बद्रीनाथ जटाळ,माजी सैनिक सुभेदार राज साहेब, मोन साहेब, धनवडे साहेब, उषा शेकडे मॅडम, आगाम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. “माँ तुझे सलाम”, “फिर भी दिल है हिंदुस्तानी”, “सुनो गौर से दुनिया वालो” या गीतांनी उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणे करून स्वातंत्र्याचे महत्त्व विशद केले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राजेंद्र मस्के म्हणाले, “स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या त्याग आणि बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या स्वातंत्र्याचे संरक्षण आणि लोकशाही अधिक सक्षम करण्याची जबाबदारी आता आपल्या पिढीवर आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत शिस्त, संस्कार, प्रामाणिकपणा, विवेक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तांदळे मॅडम, राऊत मॅडम, भोसले मॅडम, राख मॅडम, शेख मॅडम, इंगोले मॅडम, जाधव साहेब, आगाम साहेब, सानप साहेब, मुंडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मांडवे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य मुकेश जाधव सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.



