
अंबाजोगाईत आजपासून देवी भागवत ज्ञानयज्ञ सोहळा
आ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते कलश यात्रेचा शुभारंभ: ५०० महिलांच्या सहभागाने भव्य कलश यात्रा
अंबाजोगाई/प्रतिनिधी
गुरुदेव सर्वश्री आशुतोष महाराजजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली दिव्य ज्योति जाग्रती संस्थान शाखा लातूरतर्फे आयोजित श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेची सुरुवात आज भव्य आणि दिव्य अशा कलश यात्रेने झाली.
या कलश यात्रेचा शुभारंभ मा. आमदार सौ. नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे ५०० महिलांनी डोक्यावर पवित्र कलश घेऊन यात्रेत सहभाग नोंदविला. हे दृश्य अत्यंत भव्य, भाविकांच्या भक्तिभावाने नटलेले आणि दर्शनास विलोभनीय असे होते. यात्रेच्या मार्गावर उभा असलेला नागरिक भावविश्वात हरवून या यात्रेचे कौतुक करीत होता.
देवीची विशाल प्रतिमा असलेला रथ, धार्मिक झांज-पथके व भक्तीमय घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. आध्यात्मिकतेचा आणि स्त्रीशक्तीचा संगम या यात्रेमध्ये सुंदररीत्या अनुभवायला मिळाला.
या यात्रेनंतर आज दि.२५ ऑक्टोबरपासून श्रीमद् देवी भागवत महापुराण ज्ञानयज्ञ कथेचा शुभारंभ होणार आहे. साध्वी अदिति भारती जी (शिष्या सर्वश्री आशुतोष महाराजजी) यांच्या सुमधुर वाणीमधून कथा दि.२५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ३ ते ७ या वेळेत योगेश्वरी महाविद्यालय ग्राउंड, अंबाजोगाई येथे होणार आहे.
या सात दिवसीय ज्ञानयज्ञातून समाजात भक्ती, ब्रह्मज्ञानाचा संदेश पोहोचविण्याचा उद्देश असून दिव्य ज्योती परिवाराने सर्व भाविकांना या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.



