बीड

तुकाराम मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी द्यावी !

तुकाराम मुंडे यांना विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी द्यावी !
✍️
लेखक – इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
          मायबाप सरकारने २१ वर्षात २५ बदल्या केल्या, आता आणखी एक बदली निवडणूक आयोगात करुन मा. तुकाराम मुंडे यांच्यावर विधान परिषदेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात यावी, म्हणजे कांही प्रमाणात का होईना या छोट्याशा निवडणुकीतील घोडेबाजारास निश्चितपणे आळा बसेल !
         २१ वर्षात २५ बदल्या हा आकडा म्हणजे तुकाराम मुंडे साहेबांच्या प्रामाणिकपणाचा आणि भ्रष्ट महाराष्ट्र सरकारच्या काळया प्रशासनाचा पुरावा आहे. जिथे जिथे मुंडे साहेबांची बदली झाली त्या त्या विभागाची त्यांनी निडर होऊन बिनधास्तपणे पोलखोल केली म्हणून “प्रामाणिक” राज्यकर्ते त्यांची सतत बदली करीत असतात. स्वतः आमदार म्हणून निवडून येण्यासाठी हे राज्यकर्ते वर्षानुवर्षे एकाच मतदार संघात तळ ठोकणार व पुन्हा पुन्हा तिथेच निवडणूक लढवणार, स्वतः थकले की बायको, पोरगा, पोरगी आणि नंतर मग भाऊ, भावजय, पुतण्या असा क्रम असतो (यालाच ते लोकशाही म्हणत असतात..) पण अधिकाऱ्यांना मात्र एका ठिकाणी राहून चांगले काम ते करु देणार नाहीत. जनआक्रोशाच्या गोंडस बहाण्याखाली आपल्या बगलबच्यांना खुश करण्यासाठी ते प्रामाणिक अधिकाऱ्यांचे वारंवार बळी देत असतात. जनता बिचारी विसरभोळी असते.
           राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेचे नगरसेवक आदी मतदार हे दात घासून बसले असतील. कोणाकडून किती चाय नाष्टा मिळतो याची बहुदा ते वाट पाहत असावेत. एखादा भोजन देणारा भेटला तर मग चांग भले झाले..! तसे तगडे उमेदवार राजकीय पक्षांनी निवडलेले असतात. जिल्हाधिकारी महोदय आदर्श आचारसंहिता वगैरे बाबी प्रामाणिकपणे पाहत असतात व तशा बैठका ते वारंवार घेत असतात. सबकुछ आलबेल है असे दाखविण्याचा तो प्रामाणिक प्रयत्न असू शकतो. एखाद्या लोकहिताच्या प्रश्नावर अशा तातडीच्या बैठका वगैरे होत नसतात बरे (हिच तर खरी लोकशाही असावी !).
           लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सारे नियम पायदळी तुडवून विधान परिषदेच्या निवडणुकीचा घोडेबाजार बहरुन येत असतो. पाच पन्नास रुपयांची एखाद्या कर्मचाऱ्याने लाच मागितली तर त्याला जेरीस आणण्यासाठी मोठ मोठे प्रामाणिक सापळे रचले जात असतात आणि विधान परिषद निवडणुकीत लाखो करोडोची उलाढाल होत असताना राज्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मात्र गाढ झोपलेले असते. त्यांना कुणी तरी तक्रार दिली तरच ते सापळा वगैरे रचतात म्हणे ! आता इथे तक्रार कोण देणार ?
          शासनानेच पुढाकार घेऊन कांही ठोस उपाययोजना केल्या तरच विधान परिषदेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबू शकतो. पैशाच्या या प्रचंड उलाढालीमुळे सर्वसामान्य कार्यकर्ता प्रामाणिक असूनही या निवडणुकीत उभे राहण्याची हिंमत करु शकत नाही, म्हणून तर निष्ठावंतांना डावलून पैसेवाल्यांना तिकीट देऊन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्यात येत आहे, यालाच आपण लोकशाही समजण्याची घोडचूक करीत आहोत !
          विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजाराला खरेच आळा घालावा असे जर कुणाला प्रामाणिकपणे वाटत असेल तर यासाठी सर्व संभाव्य उमेदवार आणि मतदार यांचे निवडणुकीपूर्वीचे आणि नंतरचे बँक खाते तपासले किंवा त्यांच्या प्रत्येक व्यवहारावर पाळत ठेवली तर भ्रष्टाचार उघडकीस येऊ शकतो. कालपर्यंत कफल्लक असलेला हा “मतदार” एकदम रातोरात लखपती कसा काय होतो ? या काळात त्याने केलेली देवाण घेवाण आणि त्याचे बाजारातील व्यवहार तपासले तरी बरेच पितळ उघडे पडू शकते पण हे करणार कोण ? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? नांदेडचे जिल्हाधिकारी महोदय असा धाडसीपणा दाखवू शकतील काय ? शिवराज मोटेगावकर याची आर सी सी कोचिंग क्लासेसची इमारत पाडण्याची हिंमत अजून कुणी दाखविली नाही तर विधान परिषदेच्या भावी आमदारांना चाप कोण लावणार ? आहे का कुणी सिंघम ?
           मा. तुकाराम मुंडे, आय ए एस यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यानंतर फक्त ७ दिवसांत ७५ पेक्षा जास्त कारवाया केल्या, ५३ धाडी टाकल्या आणि ३३ दोषींना अटक केली ! हा तर फक्त ‘ओपनिंग स्पेल’ आहे, खरी मॅच तर अजून बाकी आहे ! अशी मॅच अन्य कुणी आय ए एस खेळतील काय ? फक्त चित्रपटातील हिरो आणि तुकाराम मुंडे हेच असा करिष्मा करु शकतील. हिरो असलेले विजय थलपती आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांच्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका कशा पार पडतात, हे पाहणे देखिल खूप मजेशीर ठरेल !
       *- इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर*
        राज्य कार्यकारिणी सदस्य, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र
मो. ९४२३७८१११४
Back to top button