कन्या विद्यालयात ट्रॅक्टर मिरवणुकीत नवागत विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत

कन्या विद्यालयात ट्रॅक्टर मिरवणुकीत नवागत विद्यार्थिनींचे जल्लोषात स्वागत
जामखेड प्रतिनिधी :रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयात आज दिनांक १६ जून २०२५ रोजी नव्या शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने नवागत विद्यार्थिनींचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थिनींचे ट्रॅक्टरमधून स्वागत मिरवणूक विशेष आकर्षण ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली. नव्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी लागली पाहिजे. शिक्षण मजेत आणि आनंदात घेतल्यास यश निश्चित मिळते. ही कर्मवीरांची शाळा आहे. शाळा आपलीच आहे, अशी भावना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात रुजली पाहिजे.विद्यार्थ्यांनी मोबाईलला थोडा वेळ बाजूला ठेवून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. आपले हित, कल्याण आणि चांगल्या गोष्टींचा विचार करत शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.शाळेचा निकाल उंचावण्यासाठी सर्व शिक्षक मोठ्या निष्ठेने आणि मेहनतीने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनीही पवित्र भावनेने शाळेकडे पाहावे, नियमित शाळेत यावे आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास निश्चितच यश मिळेल.
यावेळी ज्येष्ठ नेते सुरेश भोसले बोलताना म्हणाले की,शिक्षण हेच तुमचे खरे सामर्थ्य आहे. शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न घेता उत्तम संस्कारही घ्या. शिक्षकांचे ऐका, शाळेचे नाव उज्वल करा.
मुख्याध्यापिका रोहिणी भोर यांनी विद्यार्थिनींना सदिच्छा व्यक्त करताना सांगितले की, शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीची नियमित उपस्थिती, शिस्त आणि अभ्यासातील प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये अंगीकारा आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षक सदैव तुमच्यासोबत आहेत,असे त्या म्हणाल्या.
यावेळी माजी विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील आठवणी जाग्या केल्या.
यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य तथा ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, जेष्ठ नेते सुरेश भोसले,प्रकाश सदाफुले, कुंडल राळेभात, मुख्याध्यापिका रोहिणी भोर, पर्यवेक्षक संजय हजारे,गुरुकुल प्रमुख बाबासाहेब आंधळे, मोहन यादव,सुग्रीव ठाकरे,अशोक घोडके, विलास पवार, प्रशांत पोकळे, विशाखा ससाणे,मिरा साळुंके , रश्मी मुसळे,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपाली सांगळे आदी शिक्षक, पालक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर व शंभूदेव बडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना शिंदे यांनी मानले.



