बीड

ऐतिहासिक वारशाची विटंबना; तहसीलदार खोमणे,काळे, ढाकणे यांच्या कारभारावर संताप

ऐतिहासिक वारशाची विटंबना; तहसीलदार खोमणे,काळे, ढाकणे यांच्या कारभारावर संताप
———————–
गेवराई (प्रतिनिधी) राक्षसभुवन परिसरातील हिंदू स्मशानभूमीतून बोगस घरकुलधारकांच्या नावाखाली वाळू वाटप केल्याचा गंभीर आरोप होत असून तहसीलदार खोमणे यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी हिंदू समाजाची स्मशानभूमी आरक्षित आहे, त्याच परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करून ती कथित बोगस घरकुलधारकांना वाटप करण्यात आली. विशेष म्हणजे, ऐतिहासिक निजाम-पेशवे लढाईचा वारसा लाभलेल्या परिसरातील बाजीराव पेशव्यांच्या समाधीलगतच वाळूचे हायवे भरुन टाकण् जाताना इतिहासप्रेमी व भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला की, “इतिहासाचा वारसा जपण्याऐवजी प्रशासनाकडूनच त्या पवित्र स्थळाची विटंबना होत आहे. समाधी परिसरात अवैधरित्या वाळू साठवून ऐतिहासिक स्मारकाचा अपमान करण्यात आला आहे.”
याप्रकरणी महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून तहसीलदार खोमणे यांनी नेमक्या कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या फायद्यासाठी हा प्रकार घडू दिला, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
ग्रामस्थ व भाविकांनी जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि महसूल विभागाने तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
चौकट…
“इतिहास जपणार कोण?”
बाजीराव पेशव्यांच्या ऐतिहासिक समाधीजवळ वाळूचे ढीग टाकून पवित्र स्थळाचे सौंदर्य व ऐतिहासिक महत्त्व धोक्यात आले आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन स्मारक परिसर संरक्षित करावा, अशी मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.
चौकट….
विना नंबरच्या गाड्या सुसाट; प्रशासनाचे मात्र डोळेझाक
तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीसाठी विना नंबरच्या गाड्या भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रात्रीसह दिवसाढवळ्या हायवेवरून व गावांतून या गाड्यांची वाहतूक सुरू असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने अपघात किंवा गैरप्रकार घडल्यास संबंधित वाहनांचा शोध घेणे कठीण होत आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही संबंधित प्रशासन व पोलीस विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू आहे.
विना नंबरच्या गाड्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून, तात्काळ मोहीम राबवून अशा वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
Back to top button