बीड

आदित्य महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात बारामती, महाबळेश्वरसह कोकणातील अन्न कंपन्यांना भेटी

आदित्य महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात

बारामती, महाबळेश्वरसह कोकणातील अन्न कंपन्यांना भेटी

प्रतिनिधी | बीड
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या बीड शहरातील आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न झाली. तिसऱ्या व पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी या सहलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. पाच दिवसांच्या कालावधीत ही सहल महाराष्ट्रातील विविध औद्योगिक आणि प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत यशस्वीरित्या पार पडली.

आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा,  संचालक डॉ. आदित्य सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य पी. एस. राठोड यांनी अन्नतंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगताचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसांच्या या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी राज्यातील आघाडीच्या अन्न प्रक्रिया कंपन्यांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. यामध्ये आय.एन.आय. फार्म (बारामती), मेप्रो फूड्स प्रायव्हेट लिमिटेड (वाई, महाबळेश्वर) आणि रत्नागिरी येथील गदरे मरीन एक्स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग, शीतगृहांचे व्यवस्थापन आणि गुणवत्ता नियंत्रण याविषयीचे तांत्रिक ज्ञान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजून घेतले.विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालण्यासोबतच विरंगुळा मिळावा म्हणून या सहलीत महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचाही समावेश करण्यात आला होता. मोरगावचा मयुरेश्वर, जेजुरीचा खंडोबा, नारायणपूरचे एकमुखी दत्त मंदिर, प्रति बालाजी, काशी विश्वेश्वर मंदिर, महागणपती मंदिर, जोतिबा आणि पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट देऊन दर्शन घेतले. तसेच ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे वैभव अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांनी रायगड किल्ल्याला भेट दिली. महाबळेश्वरचे विलोभनीय पॉईंट्स, कोकणातील प्रसिद्ध गणपतीपुळे आणि आरे-वारे समुद्राचा विस्तीर्ण किनारा पाहून विद्यार्थी सुखावले. सहल यशस्वी करण्यासाठी प्रा. गुजर, प्रा. पुंडे, प्रा. मोराळे, प्रा. मिसाळ यांनी  विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रातील कामाचा अनुभव मिळणे गरजेचे आहे. या सहलीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल.
-डॉ. आदिती सारडा, संचालिका, आदित्य शिक्षण संस्था

Back to top button