बीड
खाकी वर्दीतील माणुसकी; हरवलेला 65 हजारांचा मुद्देमाल अवघ्या तीन तासांत परत

खाकी वर्दीतील माणुसकी; हरवलेला 65 हजारांचा मुद्देमाल अवघ्या तीन तासांत परत
गेवराई प्रतिनिधी :
तलवाडा पोलिसांच्या तत्परतेमुळे हरवलेला पर्स, आयफोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल अवघ्या तीन तासांत शोधून संबंधित महिलेला परत करण्यात आला. या घटनेमुळे पोलिस दलातील माणुसकी व कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडले असून सर्व स्तरातून पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
सौ. काजल श्रीराम पवार (रा. जातेगाव) यांची पर्स, आयफोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल हरवला होता. याबाबत माहिती मिळताच जातेगाव बिटचे कर्तव्यदक्ष अंमलदार काकडे तसेच पीएसओ वाघ यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. विविध ठिकाणी चौकशी व तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या तीन तासांत हरवलेला मुद्देमाल शोधून काढण्यात यश आले.
त्यानंतर संबंधित मुद्देमाल सौ. पवार यांच्याकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आला. पोलिसांच्या या तत्पर कार्यामुळे सौ. पवार यांनी समाधान व्यक्त करत पोलिस प्रशासनाचे आभार मानले.
दरम्यान, तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पीएसआय स्वप्नील कोळी व पीएसआय कैलास अनलदास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱ्यांचे कामकाज प्रभावीपणे सुरू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.



