बीड

तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी:वै. सिद्धसंत सद्गुरु सिताराम बाबा (सितारामगड, खर्डा) व श्री संत नानाबाबा गीते दिघोळकर मठ यांच्या कृपा-आशीर्वादाने तसेच हभप महालिंग महाराज नगरे (मठाधिपती, सितारामगड) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संगीत गाथा पारायण सोहळा श्रीक्षेत्र देहू, जिल्हा पुणे येथे भक्तिभावात सुरू आहे. वारकरी पंथाची अमूल्य परंपरा, अभंगवाणीचा गजर आणि सत्संगाच्या सुवासाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे.
या सप्ताहातील संगीत प्रवचनांची सेवा ज्ञानेश्वर महाराज नगरे, किसन महाराज पवार व हरिभाऊ महाराज गीते यांनी केली. तुकाराम महाराजांच्या अभंगांतील समाजप्रबोधन, ज्ञानयोग, भक्ति-प्रपंच यांचे सुंदर विश्लेषण त्यांच्या प्रवचनांतून झाले. भाविकांनी या रसाळ प्रवचनांना मोठा प्रतिसाद दिला.
सप्ताहभर दररोजच्या हरीकिर्तनाची माळ विविध किर्तनकारांनी सजवली. यात रामेश्वर महाराज केणकर (आळंदी), ज्ञानेश्वर महाराज तावरे (आळंदी), धर्मराज महाराज सामनगावकर (सामनगाव), एकनाथ महाराज सांगोलकर (आळंदी), लक्ष्मण महाराज कुडंगर (देहू), रामभाऊ महाराज निंबाळकर (माढा) व अनिल महाराज माखले (आळंदी) यांनी सहभाग घेतला. प्रत्येक कीर्तनातून नामस्मरण, संतवचन आणि भक्तीभावाचा झंकार घुमत राहिला.
शुक्रवारी २८/११/२०२५ हभप महालिंग महाराज नगरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून, या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहणार आहेत. विशेष वाहतूक, पाणी, सुरक्षा व्यवस्था समितीने केली आहे.
या सप्ताहात खर्डा शहर, पंचक्रोशी तसेच पुणे जिल्हा व राज्यभरातून आलेल्या अन्नदात्यांनी पंगतीची सेवा करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हजारो भाविकांना प्रेमपूर्वक भोजन देण्यात आले असून, “अन्नदान हे श्रेष्ठ दान” या तत्त्वाची प्रचीती यातून आली.
श्रीक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज वैकुंठगमन मंदिर– देहू नांदुरकी येथे सुरू असलेल्या या गाथा पारायण सोहळ्यास राज्यभरातून भक्तांची गर्दी होत आहे. वारकरी दिंड्या, भजन मंडळे आणि महिलांचा उत्साही सहभागामुळे सोहळ्याला अधिक रंगत आली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज नगरे, हरिभाऊ महाराज गीते, युवराज आबा गोलेकर यांच्यासह अनेक सेवक व वारकरी परिश्रम घेत आहेत. संपूर्ण सोहळ्यामध्ये भक्ती, नामस्मरण आणि वारकरी परंपरेचा भव्य जल्लोष अनुभवायला मिळत आहे.

Back to top button