बीड

जन्मभर ज्ञान संपादन करण्याकरिता विद्यार्थी म्हणून जीवन जगा. प्रा. प्रदीप रोडे

जन्मभर ज्ञान संपादन करण्याकरिता विद्यार्थी म्हणून जीवन जगा. प्रा. प्रदीप रोडे

 (वाचाल तर वाचाल वाचनालय व महामानव अभिवादन ग्रुप तर्फे शाळा प्रवेश दिन उत्साहात संपन्न)
बीड (प्रतिनिधी) पुस्तकांच्या सहवासात राहून अतिउच्च शिक्षण प्राप्त करणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापरिनिर्वाणापर्यंत विद्यार्थी म्हणून जगले व आगाध ज्ञान प्राप्त केले तरी ज्ञानाच्या गुडघाभर पाण्यातच आहे असे उद्गार काढणारे डॉक्टर बाबासाहेबांच्या वाचाल तर वाचाल ह्या अनमोल उपदेशाचे आपल्या जीवनात पालन करणे कसे गरजेचे आहे हे प्राध्यापक प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तर रूपात अध्यक्षीय समारोपप्रसंगी संवाद साधताना समजावून सांगितले.
     वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालय व महामानव अभिवादन ग्रुप बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 7 नोव्हेंबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन व विद्यार्थी दिन म्हणून सम्यक सम्म बुद्ध विहार नागोबा गल्ली, बीड येथे विविध उपक्रमांनी संपन्न केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. प्रदीप रोडे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक माननीय सुभाष साळवे, सेवानिवृत्त सीईओ पी. व्ही. बनसोडे, प्रा. डॉ. उपप्राचार्य उत्तमराव साळवे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी सखाराम उजगरे, प्रा. श्रीराम जाधव लाभले होते महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी.एम. भोले, कॅप्टन राजाभाऊ आठवले, प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड, प्रा. अशोक गायकवाड, डॉक्टर अशोक गायकवाड, समाजसेवक राजु जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी तर प्रास्ताविक जी.एम. भोले यांनी केले. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामूहिक त्रिशरण – पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते 5 जेष्ठ महिलांचा माता रमाई, राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब यांच्या जीवन चरित्राची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन वाचाल तर वाचाल तर्फे सत्कार करण्यात आला; ज्या मातांनी लौकिक अर्थाने शिक्षण घेतलेले नाही परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या शिक्षण घेण्याच्या आवाहनानुसार अनेक हालापेष्टा सहन केल्या व आपल्या पाल्यांना, नातवांना शिक्षणाची कास धरावयास लावली. वाचाल तर वाचाल वाचनालयातर्फे 16 वे केंद्र असलेल्या या विहारात 6 फेरीतील 50 पुस्तकाचा संच
विद्यार्थ्यांना वितरित करण्याकरता आयु. बबन जोगदंड यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी या संचातील पुस्तकांचा विद्यार्थी व पालकांनी पुरेपूर उपयोग घ्यावा असे नम्र आवाहन विद्यार्थी व पालकांना वाचनालयाचे अध्यक्ष डी.जी. वानखेडे यांनी केले. शाळा प्रवेश दिनाचे व विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून गरजू व होतकरू विद्यार्थ्यीनी रिंकू जोगदंड वर्ग 10 वी या विद्यार्थीनीला फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची व स्पर्धा परीक्षा करता उपयोगी 16 पुस्तके पेन कंपास (शालेय साहित्य) देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील शिक्षणाकरता शुभेच्छा देण्यात आल्या. दरवर्षी 2018 सालापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनी एका गरजू व होतकरू विद्यार्थ्यास अशाच प्रकारचे सहाय्य करून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरता वाचाल तर वाचाल वाचनालय मदत करीत असते. कार्यक्रम प्रसंगी प्रा. श्रीराम जाधव उपस्थितांना संबोधितांना म्हणाले की, जगात ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाकरता घेतलेल्या अपार कष्टाची आठवण विद्यार्थी व पालकांनी सतत केली पाहिजे. ते म्हणाले की, ‘बाबा असावे तर रामजी बाबा सारखे’ ज्यांनी आपल्या भिवाला शिक्षणाचे व समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले, याबद्दल सविस्तर विवेचन करून विद्यार्थी व पालकांनी रामजीबाबा व डॉक्टर बाबासाहेबांचा व त्यागमुर्ती रमाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात शिक्षणातून होणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक बदला करता सदैव तत्पर असले पाहिजे. प्राचार्य सुशीलकुमार गायकवाड व समाजसेवक प्रशांतजी वासनिक यांनी देखील मुलांना मोलाचे मार्गदर्शन करून शाळा प्रवेश दिन का साजरा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व मान्यवरांचा उपदेश विद्यार्थी एक चित्ताने व शांततेने ऐकत होते. अध्यक्ष समारोपानंतर प्रा. प्रदीप रोडे यांनी मान्यवरांनी दिलेल्या उपदेशावर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारल्यानंतर अचूक उत्तरे देणारे विद्यार्थी स्वराज सुजित कांबळे इयत्ता चौथी यांनी दोन हजार रुपये बक्षीस मान्यवराकडून मिळविले तर संदीप जयदीप साळवे इयत्ता दुसरी यांनी 300 रुपये बक्षीस पटकावले. त्यांचे टाळ्यांच्या गजरात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी मिळालेल्या दानातून मुख्य कार्यक्रमापूर्वी तथागत बुद्ध विहार बलभीम नगर बीड येथे महामानव अभिवादन ग्रुप तर्फे 44 विद्यार्थ्यांना तर सम्यक सम बुद्ध विहार येथे 55 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य (वही पेन) वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार अडवोकेट तेजस वडमारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. सरणयतयाने व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Back to top button