बीड
विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या संकेतस्थळाचे ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या संकेतस्थळाचे ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण
*संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा*
मुंबई, ।दिनांक ०४।
विदर्भ व मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विदर्भ–मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प (VMDDP) टप्पा २ अंतर्गत विकसित केलेल्या vmddp.com या संकेतस्थळाचे अनावरण राज्याच्या पशुसंवर्धन व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज मुंबई येथे झाले.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. संजय गोरानी, डॉ. नाना सोनवणे व डॉ. नरेंद्र पाटील हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, विदर्भ–मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या नव्या डिजिटल उपक्रमाचा लाभ घेत दुग्ध व्यवसाय अधिक आधुनिक करून उत्पन्न वाढवावे.
*संकेतस्थळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा*
——-
या संकेतस्थळाद्वारे विदर्भातील ११ व मराठवाड्यातील ९ जिल्ह्यांतील दुग्ध उत्पादकांना खालील योजनांचा लाभ ऑनलाईन अर्जाद्वारे घेता येणार आहे —
• उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या गायी व म्हशींचे वाटप
• उच्च उत्पन्नक्षम मृणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे वितरण
• दोन वेतातील अंतर कमी करण्यासाठी “Fertility Feed” (पशुप्रजनन पूरक खाद्य) पुरवठा
• दुधातील फॅट व एसएनएफ वाढविण्यासाठी विशेष खाद्य पूरक पुरवठा
• हिरव्या वैरणीच्या टंचाईवर उपाय म्हणून बहुवार्षिक चारा बियाणे व ठोब पुरवठा
• विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रे व मुरघास वितरण
• गायी–म्हशींमधील वंध्यत्व निवारण कार्यक्रम
• आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम
*थेट अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना*
या योजनांतील विविध घटकांवर २५ ते ७५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार असून, ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे.
*महिला दुग्ध उत्पादक गटांना प्रोत्साहन*
या प्रकल्पांतर्गत महिला दुग्ध उत्पादक गटांची स्थापना करण्यात येणार असून, त्यांना राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ (NDDB) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आवश्यक तांत्रिक सुविधा, प्रशिक्षण व मार्गदर्शन पुरविण्यात येणार आहे.
••••


