बीड

योग्य सवयी अंगीकारल्या तर चिरतरुणता शक्य – डॉ.प्रदीप उजगरे

योग्य सवयी अंगीकारल्या तर चिरतरुणता शक्य – डॉ.प्रदीप उजगरे

तुलसी व माता रमाई नर्सिंग कॉलेजमध्ये जागतिक मधुमेह दिन विविध उपक्रमांनी साजरा

बीड (प्रतिनिधी) – योग्य आहार, नियमित व्यायाम आणि संतुलित दिनचर्या अंगीकारल्यास चिरतरुण राहणे सहज शक्य आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉ.प्रदीप उजगरे यांनी जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात केले. देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि माता रमाई नर्सिंग कॉलेज येथे शुक्रवार, दि.१४ रोजी जागतिक मधुमेह दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी डॉ.प्रदीप उजगरे यांनी मधुमेहाची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. सवयी योग्य असल्या की शरीर निरोगी राहते आणि निरोगी शरीर हेच चिरतरुणतेचे रहस्य आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त डॉ.सुनील जोंधळे, प्राचार्य डॉ.विजयकुमार बांदल, प्राचार्य प्रकाश ढोकणे, प्रा.मगन ओव्हाळ, डॉ.पल्लवी धेंडे तसेच नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य राऊत डी.डी.उपस्थित होते.

यानंतर दोन्ही कॉलेजमध्ये संयुक्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत स्पर्धा रंगतदार झाली. यात तुलसी कॉलेज ऑफ नर्सिंगमधील कु.भारती लांडगे प्रथम, श्रीनिकेत देवकते द्वितीय,अंजली कुरकुटे तृतीय ठरल्या. तर माता रमाई नर्सिंग कॉलेजमधील अर्पिता गायकवाड प्रथम, सुप्रिया पानसंबळ द्वितीय, राहुल वाघमारे तृतीय ठरले, तसेच कार्तिकी वीर यांना उत्तेजनार्थ बहुमान मिळाला.

विजेत्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, पुस्तक, प्रमाणपत्र आणि पेन देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा.प्रतिक्षा वेडे, प्रा.सुप्रिया वाघमारे, प्रा.मिलिंद वडमारे, प्रा.अब्रार पठाण, प्रा.इनामदार सोहेल, दीपाली बहिर आणि आकाश राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.

Back to top button