संपादकीय

“प्रश्न सुटले नाहीत तर अधिवेशनात सरकारला जागे करू!” — आमदार काळेंचा ठाम इशारा

 नागरिकांच्या समस्यांना दिला तात्काळ न्याय; पुनर्वसनाचा प्रश्न होणार मार्गी!

 सुहास सावंत / पुणे

करंजविहरे येथे आज पार पडलेल्या जनसवाद कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक नागरिकांच्या विविध अडचणी, सुविधा, तसेच विकासाच्या प्रश्नांवर थेट संवाद साधत या कार्यक्रमाने प्रशासन आणि जनता यांच्यातील थेट नाळ जुळविण्याचे आमदार बाबाजी काळे यांनी व्यासपीठ निर्माण केले.

कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या तातडीच्या समस्या — महावितरण, पाणीपुरवठा, रस्ते, नळजोडणी, पुनर्वसन आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न मांडताच काही समस्या त्वरित सोडवून देण्यात आल्या, ज्यामुळे जनतेत समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर विशेष भर देण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांनी जिल्हाधिकारी (कलेक्टर) यांची भेट घेऊन ठोस निर्णय मिळविण्याचे आश्वासन या जनसवादात देण्यात आले. नागरिकांच्या अपेक्षा आणि तक्रारींची सखोल माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “प्रशासकीय स्तरावर प्रश्न सुटले नाहीत, तर डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा आक्रमकपणे मांडला जाईल. नागरिकांच्या न्यायासाठी प्रत्येक पातळीवर लढा देऊ.”

जनसवाद कार्यक्रमात स्थानिक नागरिकांनीही आपली मते निर्भीडपणे मांडली. अनेकांना तिथेच दिलासा मिळाल्याने कार्यक्रमाचे रूपांतर एकप्रकारे ‘न्यायदरबारात’ झाले. नागरिकांनी व्यक्त केलेल्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे प्रशंसनीय उदाहरण उपस्थितांनी दिले.

करंजविहरे ग्रामस्थांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा खरा अर्थ या जनसवादातून अधोरेखित झाला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रशासनाने दिलेली प्रतिसादात्मक भूमिका आणि प्रतिनिधींची तळमळ यामुळे करंजविहरेत आजचा दिवस लोकशाहीचा सण ठरला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व नागरिकांचा भरघोस सहभाग पाहता, हा जनसवाद पुढील काळात इतर गावांसाठीही आदर्श ठरणार आहे.

Back to top button