बीड
रिक्षाचालकासोबत वाद; जमावाकडून एसटी बसवर दगडफेक, महिला वाहकाला मारहाण

रिक्षाचालकासोबत वाद; जमावाकडून एसटी बसवर दगडफेक, महिला वाहकाला मारहाण
प्रतिनिधी | बीड:-मांजरसुंबा येथे किरकोळ वादातून सुरू झालेला वाद बीड शहरात मोठा तणाव निर्माण करणारा ठरला. एसटी बस आणि रिक्षा चालकामधील वादानंतर जमावाने बस थांबवून त्यावर दगडफेक केली. या गोंधळात महिला वाहकाला मारहाण करत तिच्याकडील मोबाईल व रोकड हिसकावल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
सोलापूरहून बीडकडे निघालेली (एमएच ०९ एफएल ०९६८) ही बस मांजरसुंबा बसस्थानकात थांबली असता रिक्षाचालक आणि एसटी चालक बाजीराव रसाळ यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर रिक्षाचालकाने बसचा पाठलाग करत बीडच्या बार्शी नाका परिसरात बसला आडवले.
वाद वाढल्याची माहिती रिक्षाचालकाने आपल्या नातेवाइकांना दिली होती. त्यानुसार काही लोकांनी बार्शी नाक्यावर बस थांबवली. याचदरम्यान बस चालक आणि रिक्षाचालकांमध्ये वाद सुरू असतानाच जमावाने अचानक दगडफेक केली. बसच्या काचा फोडण्यात आल्या.
या गोंधळात महिला वाहक पी.डी. हावळे या मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असताना रिक्षामधून आलेल्या तीन महिलांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातातील मोबाईल आणि काही रोख रक्कम हिसकावून घेण्यात आली. हावळे यांनी तात्काळ जवळच्या पोलिस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिली.
—
रिक्षाचालक अटकेत; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत दुपारी ४.३० ते सायंकाळी ७ या वेळेत तब्बल अडीच तास बससेवा बंद ठेवली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.
दरम्यान, पेठ बीड पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून एसटी चालकाच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ठाणेप्रमुख पीआय अशोक मुदीराज यांनी सांगितले.
—
‘सीसीटीव्ही फुटेज तपासावेत’ – महिला वाहक
“जमावाकडून बसवर दगडफेक सुरू होती. मी मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करत होते. त्यावेळी रिक्षामधून आलेल्या महिलांनी मला मारहाण केली. मोबाईल आणि माझ्याजवळची कॅश हिसकावून घेतली. मी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. बार्शी नाका परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ते तपासले जावेत,” अशी प्रतिक्रिया महिला वाहक पी.डी. हावळे यांनी दिली.
—



